सैनिकांच्या झटापटीनंतर भारत – चीनने सीमेवरील तैनाती वाढविली

नवी दिल्ली – भारतीय सैनिक आणि चीनच्या जवानांमध्ये झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांनी सीमेवर अतिरिक्त सैनिकांची तैनाती केली आहे. शनिवारी सिक्कीमच्या नाकू ला सेक्टरजवळ सीमा भागात हा संघर्ष घडला होता. तसेच 5 मे रोजी लडाखमधील पॅगोंग सरोवराजवळही दोन्ही देशांचे सैनिक अशाच प्रकारे एकमेकांसमोर खडे ठाकले होते, अशी माहितीही आता उघड झाली आहे. आठवड्याभरात दोनवेळा भारत आणि चीनचे सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव अधिक वाढला आहे.

सीमेवर झालेल्या या संघर्षावर चीनने अतिशय सावध प्रतिक्रिया दिली असून सीमेवर सौहार्द कायम राहावे अशी आपली भूमिका असल्याचे चीनने म्हटले आहे.

उत्तर सिक्कीममधील नाकू ला सेक्टरमध्ये चिनी जवानांचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न भारतीय सैनिकांनी हाणून पाडला होता. त्याचे काही तपशील आता लष्करी सूत्रांच्या हवाल्याने समोर येत आहेत. नाकू ला सेक्टरमधील मुगुथान्गमध्ये व्हॅलीमध्ये गस्त घालणाऱ्या भारतीय सैनिकांना चिनी जवानांनी भारतीय सीमेत घुसखोरी केल्याचे लक्षात आले. या भारतीय सैनिकांनी चिनी जवानांना तिथेच रोखले आणि परत जाण्यास बजावले. मात्र चिनी जवानांचे नेतृत्व करणाऱ्या चिनी मेजरने ‘ही तुमची भूमी नाही, भारताची सीमा नाही, त्यामुळे तुम्हीच येथून परत जा’, अशी चिथावणी मागणी करून भारतीय सैनिकांना धमकावले. सिक्कीममधील भारतीय भूमीत उभे राहून भारतीय जवानांच परत जा असे धमकावणाऱ्या या बड्या चिनी अधिकाऱ्याला भारतीय जवानांच्या पथकातील तरुण लेफ्टनंट अधिकाऱ्याने जशास तसे उत्तर दिले. चीनच्या मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याला एक जोरादार ठोसा लगावून खाली पडले. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांनामध्ये झटापट झाल्याची माहिती समोर येत आहे.

पुढे हा वाद प्रोटोकॉल अंतर्गत चर्चेतून मिटविण्यात आला आणि दोन्ही देशांचे सैनिक परत माघारी आपल्या चौक्यांवर परतले. मात्र हा तणाव कमी झालेला नाही. आता दोन्ही देशांनी सीमेवरील तैनातीत वाढ केल्याची बातमी समोर येत आहे. सिक्कीमच्या चार दिवस आधी लडाखमध्येही चिनी सैनिकांनी घुसखोरीचा करण्याचा प्रयत्न केला होता. येथेही भारतीय सैनिकांनी चिनी जवानांना माघारी जाण्यास भाग पाडले होते. पॅगोंग सरोवराच्या उत्तरेकडे पूर्व लडाखमध्ये ५ मे रोजी दोन्ही देशांचे जवान एकमेकांसमोर खडे ठाकले होते आणि येथेही दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये जोरादार झटापट झाली. यामध्ये दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी चर्चेनंतर वाद मिटविण्यात आला. पण त्यानंतर या भागात दोन्ही देशांनी सैनिकांची तैनाती वाढविली.

दरम्यान, दोन्ही देशांच्या सैनिकांनामध्ये झालेल्या या संघर्षांनंतर चीनने सावध प्रतिकिया दिली आहे. चिनी सैनिक नेहमीच सीमेवर शांतात राखण्याचा प्रयत्न करतात, असे सांगून चीनच्या परराष्ट्रीय मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी अप्रत्यक्षपणे या घटनेचे खापर भारतावर फोडण्याचा प्रयत्न केला. पण घटनेचे तपशील चीनच्या प्रवक्त्यांनी दिलेले नाही. भारत आणि चीनमध्ये सीमेवरील बाबींबाबत सवांद आणि समन्वय सुरु आहे, असे लिजियान यांनी म्हटले आहे.

leave a reply