लॉकडाऊन शिथिल केल्याने पाकिस्तानात ५० हजार जणांचा बळी जाईल

पाकिस्तानच्या डॉक्टरांचा इशारा

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये कोरोनाव्हायरसच्या साथीत ६७८ जणांचा बळी गेला आहे. पण ही तर सुरुवात आहे. पाकिस्तानच्या सरकारला जनतेच्या जीवापेक्षा अर्थव्यवस्था महत्त्वाची वाटत असेल तर ४० ते ५० हजार जणांचा बळी घेण्याची तयारी ठेवा, असा इशारा पाकिस्तानच्या डॉक्टरांनी इम्रान खान यांच्या सरकारला दिला आहे. डॉक्टरांची मागणी धुडकावून लॉकडाऊनचे नियम शिथिल करणाऱ्या सरकारवर भयंकर पश्चातापाची वेळ ओढावेल, असे इशारे या डॉक्टरांच्या संघटनांकडून दिले जात आहे. सोमवारी पाकिस्तानच्या बाजारपेठांमध्ये झालेली झुंबड पाहता हा इशारा लवकरच प्रत्यक्षात उतरेल, असे स्पष्टपणे दिसत आहे.

पाकिस्तानमध्ये ३१ हजारहून अधिक जणांना या साथीची लागण झाली आहे. मे महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानमध्ये कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या एक ते दीड लाखांवर जाईल, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर जून महिन्यात ही संख्या चार लाखांवर जाईल, असे सांगून या तज्ज्ञांनी पाकिस्तानच्या सरकारला सावधानतेचा इशारा दिला. अर्थव्यवस्था सावरण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे खरी पण यासाठी ४० ते ५० हजार जणांचा बळी द्यायला सरकार तयार आहे का? असा सवाल पाकिस्तानी डॉक्टरांच्या संघटना करीत आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोनाव्हायरसच्या साथीपेक्षाही भूक ही पाकिस्तानची सर्वात मोठी समस्या असल्याचे म्हटले होते. म्हणूनच पाकिस्तानला लॉक डाऊन परवडणार नाही, असा दावा इम्रान खान सातत्याने करीत राहिले. पाकिस्तानचे अर्थमंत्री असद उमर यांनी कोरोनाव्हायरसच्या साथीपेक्षाही रस्ते अपघातात पाकिस्तानात अधिक बळी जातात,असे सांगून लॉकडाऊन शिथिल करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते. मात्र पाकिस्तानचे डॉक्टर व त्यांच्या संघटना कोरोनाची साथ पसरली तर रुग्णांवर उपचार करण्यासाठी देशात पुरेशी हॉस्पिटल्स व सोयीसुविधा नाहीत याकडे लक्ष वेधत आहेत.

इम्रान खान यांचे सरकार पाकिस्तानला भयंकर संकटात लोटत आहे , असा आरोप विरोधी पक्षाचे नेतेही करू लागले आहेत. इम्रान खान यांच्या सवंग धोरणामुळे पाकिस्तानात खऱ्या अर्थाने लॉकडाऊनची अंमलबजावणी झालीच नव्हती. अशी टीका या देशातील माध्यमेही करीत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाव्हायरस प्रचंड प्रमाणात वाढला आहे. पण आवश्यक प्रमाणात कोरोनाच्या चाचण्याच होत नसल्याने रुग्णांची संख्या फारच कमी दिसत आहे. याकडेही पाकिस्तानचे माध्यमे लक्ष वेधत आहेत. मात्र इम्रान खान यांचे सरकार हे मनावर घ्यायला तयार नाही. या विषयावर पाकिस्तानात गंभीर वाद सुरू असताना परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी दक्षिण आशियात पाकिस्तान कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या करीत असल्याचे हास्यास्पद विधान केले आहे. यामुळे पाकिस्तानचे सरकार कोरोनाच्या साथीकडे गंभीरपणे पाहत नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.

leave a reply