वीस दिवसात ‘श्रमिक स्पेशल ट्रेन’ मध्ये ८० मजुरांचा मृत्यू

नवी दिल्ली – लॉकडाऊनच्या काळात मजुरांसाठी चालविण्यात येणाऱ्या ‘स्पेशल श्रमिक ट्रेन्स’मध्ये ८० मजुरांचा बळी गेल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) दिली आहे. देशाच्या विविध भागात अडकलेल्या मजुरांच्या समस्या पाहून रेल्वे प्रशासनाने १ मेपासून श्रमिक स्पेशल ट्रेन्स सुरू केल्या. २७ मे पर्यंत रेल्वे प्रशासनाने ३८४० ट्रेन सोडल्या असून ५२ लाखांहून अधिक मजूर आपापल्या घरी पोहोचले आहेत. पण या प्रवासादरम्यान काही मजूर दगावल्याची माहिती ‘आरपीएफ’ने उघड केलेल्या माहितीमुळे समोर येत आहे.

Shramik Train Indiaकाही दिवसांपूर्वी नऊ मजुरांचा रेल्वे प्रवासादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. आरपीएफने यावर स्पष्टीकरण दिले आहे. हे मजूर आधीपासून आजारी होते व यातले काहीजण उपचारासाठी शहरात आले होते. पण लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर ते अडकून पडले. त्यामुळे श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू झाल्यानंतर हे मजूर घरी जायला निघाले. या मजुरांचा मृत्यू थकवा, उष्मा आदी कारणांमुळे झाला आहे, असे आरपीएफकडून सांगण्यात आले आहे. आरपीएफने मजुरांच्या मृत्यूवर प्रथमच स्पष्टीकरण दिले आहे. तसेच आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी ९ मे ते २७ मे पर्यंत एकूण ८० मजूर प्रवासादरम्यान दगावल्याचे जाहीर केले. मात्र याचे तपशील जाहीर केलेले नाहीत. पण लवकरच राज्यांशी संपर्क साधून ही यादी प्रसिद्ध केली जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

रेल्वे प्रवासात एखादा प्रवासी आजारी असेल तर ट्रेन लगेच थांबवली जाते आणि जवळच्या रूग्णालयात या प्रवाशाला दाखल केले जाते. कारण प्रत्येक प्रवाशाचा जीव आमच्यासाठी मोलाचा आहे, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष वी के यादव म्हणाले. ९ मे ते २७ मेच्या काळात अशा अनेक प्रवाशांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच काही गर्भवती महिलांची प्रसूती सुखरूप झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात मजूरांच्या हालअपेष्टाची आपल्याला कल्पना आहे, असेही यादव यांनी म्हटले आहे. दरम्यान, श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये काही मजुरांचा उपासमारीने मृत्यू झाल्याचे आरोप होत आहेत. त्याचा तपास सुरू असल्याचे यादव यांनी म्हटले आहे.

leave a reply