पीओकेच्या तळांवरील दहशतवादी जम्मू- काश्मीरमध्ये घुसखोरीच्या तयारीत

- भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इशारा

नवी दिल्ली – ‘पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील सर्व दहशतवादी तळ आणि लाँचपॅड दहशतवाद्यांनी भरलेले आहेत. हे दहशतवादी जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. पण भारतीय लष्कराच्या सतर्कतेमुळे त्यांचे हे प्रयत्न उधळले जात आहेत’, असे लष्कराचे वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

POKगेल्या वर्षभरात सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात आक्रमक कारवाई केली आहे. यात अनेक मोठमोठे कमांडर्स ठार झाले आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांची भर्ती करण्यासाठी त्यांना पीओकेमधून जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या घुसखोरीला सहाय्य मिळावे, याकरिता पाकिस्तानी लष्कर सीमेवर गोळीबार करीत आहे. पण भारतीय लष्कराच्या सडेतोड प्रत्युत्तरामुळे त्यांचे हे प्रयत्न विफल ठरत असल्याचे ले.जनरल राजू पुढे म्हणाले. गेल्या ३० वर्षांपासून पाकिस्तान हेच करीत आला आहे. पण त्यांच्या या प्रयत्नांना अपयश येत असल्याचे ले. जनरल राजू म्हणाले.

जम्मू आणि काश्मीरमध्ये परिस्थिती सुधारत आहे, हे पाकिस्तानला सहनच होत नाही. म्हणूनच जम्मू आणि काश्मीरमध्ये हिंसाचार माजविण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरु आहे. पण कटकारस्थानाची पूर्वकल्पना असलेले भारतीय लष्कर पाकिस्तानचे हे डाव उधळून लावत आहे, असे ले. जनरल राजू म्हणाले. सारा देश कोरोनाव्हायरसच्या संकटाचा सामना करीत असताना भारतीय लष्कर सीमेवर दहशतवाद्यांशी मुकाबला करीत आहे, असे ले.जनरल राजू पुढे म्हणाले.

leave a reply