इराणमध्ये कोरोनाचे ४३ हजाराहून अधिक बळी

बंडखोर इराणी गटाचा दावा

लंडन – कोरोनाव्हायरसमुळे गेल्या चोवीस तासात इराणमध्ये ६३ जण दगावले असून या साथीने इराणमध्ये बळी गेलेल्यांची एकूण संख्या ७,७९७ पोहोचल्याची माहिती इराणच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी प्रसिद्ध केली. पण इराणमध्ये सात हजार नाही, तर तब्बल ४३ हजाराहून अधिक जणांचा बळी गेल्याचा खळबळजनक दावा बंडखोर इराणी गटाने केला आहे. इराणमध्ये देखील चीनसारखीच परिस्थिती असून आपल्या देशात कोरोनाचे रुग्ण रस्त्यावर कोसळून प्राण सोडत असल्याची थरकाप उडविणारी माहिती या गटाने दिली आहे.

Iran Coronaइराणच्या खामेनी राजवटीचे कडवे विरोधक असलेल्या ‘नॅशनल कौन्सिल ऑफ रेजिस्टन्स ऑफ इराण’ (एनसीआरआय) या फ्रान्समध्ये आश्रय घेतलेल्या बंडखोर गटाने ब्रिटिश वृत्तपत्राला इराणमधील परिस्थितीची माहिती दिली. कोरोनाव्हायरसच्या साथीने इराणमध्ये ७,७९७ जणांचा बळी गेल्याचा दावा सरकार करीत आहे. पण इराणच्या ३२० शहरांमध्ये पसरलेल्या या साथीने आतापर्यंत ४३,८०० हून अधिक जणांचा बळी घेतल्याचा दावा ‘एनसीआरआय’ने केला. यासाठी या बंडखोर गटाने इराणमधील ऍम्ब्युलन्स सेवेच्या नोंदी प्रसिद्ध केल्या आहेत. यामध्ये रस्त्यावरून उचललेले मृतदेह आणि दफनभूमीत नेलेल्या मृतदेहांच्या नोंदी करण्यात असल्याची माहिती ‘एनसीआरआय’ने दिली.

त्याचबरोबर इराणच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये रस्त्यावर, मेट्रो स्थानकात कोसळून पडलेल्या इराणी नागरिकांच्या मृतदेहाचे व्हिडिओ देखील या गटाने प्रसिद्ध केले आहेत. त्याचबरोबर राजधानी तेहरानमधील चिनी दूतावासातील तीन कर्मचाऱ्यांना सर्वात आधी जानेवारी महिन्यात कोरोनाची लागण झाल्याचा दावाही या गटाने केला. यापैकी एका कर्मचाऱ्याने बारा दिवसांसाठी चीनला भेट दिल्याची नोंद रुग्णालयाच्या वैद्यकीय तपासात करण्यात आली होती. पण इराण सरकारने हे दावे फेटाळले आहेत.

चीनच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना कोरोना नाही, तर तापाची लागण झाली होती, असे इराण सरकारचे म्हणणे आहे. पण चीनवर अवलंबून असलेल्या इराणच्या सरकारने चीनचा बचाव करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचा बनाव केल्याचा आरोप ‘एनसीआरआय’ने केला. चीनवर अधिक आरोप होऊ नये म्हणून इराणने युरोपमधून आलेल्या पर्यटकांमुळे या साथीचा फैलाव झाल्याचे खोटारडे दावे केल्याचा ठपका या गटाने ठेवला आहे.

काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेतील अभ्यासगटाने देखील इराणमध्ये ५५ हजाराहून अधिक जणांचा बळी जाईल, असा दावा केला होता. हा दावा करीत असताना, अमेरिकेच्या अभ्यासगटाने इराणच्या कोम शहरातील दफनभूमीचे सॅटेलाइट फोटोग्राफ प्रसिद्ध केले होते. त्याचबरोबर सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या माहितीचा आधार घेऊन इराणच्या दोनशेहून अधिक शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव झाल्याची माहिती या अभ्यासगटाने दिली होती.

leave a reply