बीजिंग/वॉशिंग्टन – लडाखच्या सीमेवरुन चीनने सैन्य मागे घेण्याच्या हालचाली सुरु केल्याचे वृत्त येत असतानाच भारत आणि चीनच्या लष्करी अधिकांऱ्यामध्ये चर्चेची दुसरी फेरी सुरु झाली आहे. या चर्चेत चीनने आक्रमक भूमिका घेतल्याचे दावे केले जातात. मात्र त्याचवेळी चीनच्या एका लष्करी अभ्यासकाने पहाडी भागातील युद्धतंत्रात भारतीय सैन्य जगभरात सर्वोत्तम असल्याची ग्वाही दिली आहे. तर अमेरिकेच्या दोन अभ्यासकांनी आजच्या भारताकडे चीनवर मात करण्याइतकी लष्करी क्षमता असल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे. यामुळे चीनने कितीही दडपण टाकले तरी भारतावर त्याचा विशेष परिणाम होणार नसल्याचा निर्वाळा अमेरिकी व चिनी लष्करी विश्लेषक देत असल्याचे दिसत आहे.
चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनियंग यांनी भारताबरोबरील सीमावादावरील चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडल्याचे म्हटले आहे. तसेच या चर्चेत ‘सकारात्मक सवलती’ दिल्या जात असल्याचे चुनयिंग म्हणाल्या. भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने देखील दोन्ही देशांना हा वाद वाढविण्यात स्वारस्य नसल्याचे सांगून वाटाघाटीद्वारे ही समस्या सोडण्यासाठी दोन्ही देश वचनबध्द असल्याचे म्हटले आहे. पण दोन्ही देशांच्या लष्करी अधिकांऱ्यामध्ये सुरु असलेल्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीत चीनने आक्रमक भूमिका स्वीकारल्याचा दावा केला जातो. यामुळे भारताबरोबरील सीमावाद चिघळून न देता दडपण कायम ठेवण्याचा चीनचा डाव असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र भारतावर लष्करी दडपण टाकल्याने चीनने प्रयत्न यशस्वी ठरु शकणार नाही, असे लष्करी अभ्यासक व सामरिक विश्लेषक स्पष्टपणे बजावत आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे एका चिनी लष्करी विश्लेषकाने आजच्या घडीला पहाडी इलाक्यातील युद्धतंत्रात भारत जगभरात अव्वल स्थानी असल्याचे प्रशस्तीपत्रक दिले आहे. अशारितीने चिनी विश्लेषकाकडून भारतीय लष्कराच्या कौशल्याची प्रशंसा झाल्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी, असे माध्यमांचे म्हणणे आहे. हुआंग गोअझी असे या अभ्यासकाचे नाव असून एका चिनी नियतकालिकासाठी लिहिलेल्या लेखात त्यांनी भारतीय लष्कराच्या कौशल्याला दाद दिली आहे. आजच्या घडीला पहाडी व दुर्गम भागातील युद्धतंत्रात अमेरिका, रशिया किंवा युरोपिय देशांचे लष्कर सर्वोत्कृष्ट नाहीत. हा बहुमान भारतीय लष्कराकडे जातो, असे या लेखात म्हटले आहे.
भारतीय लष्कराने चीनबरोबरील सीमेकडील आव्हान लक्षात घेऊन ‘माऊंटन बिग्रेड’ची उभारणी केली आहे. पर्वतरांजीमधील युध्दाचे कौशल्य व अनुभव भारतीय लष्कराच्या या ब्रिगेडकडे आहे. तसेच सियाचीनच्या भागात भारतीय लष्कराचे सुमारे सहा ते सात हजार सैनिक तैनात असतात. याकडे गोअझी यांनी लक्ष वेधले. भारतीय लष्कराकडे आधुनिक शस्त्रास्त्रे व संरक्षण साहित्य देखील आहे. मात्र भारत शस्त्रास्त्रे व संरक्षण साहित्याच्या बाबतीत स्वावलंबी नाही, या उणिवेवर गोअझी यांनी बोट ठेवले आहे.
अमेरिकेच्या हॉवर्ड स्कूलच्या ‘बेल्फर सेंटर फॉर सायन्स अँन्ड इंटरनँशनल अफेअर्स’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात चीनच्या तुलनेत भारताची लष्करी क्षमता वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र याकडे फारसे लक्ष दिले जात नाही, असा दावा ही या शोधनिबंधात करण्यात आला आहे. डॉक्टर फ्रँन्कल ओ डॉनेल आणि डॉक्टर अलेक्झांडर ओलिसा या दोन्ही अभ्यासकांनी भारत आणि चीनच्या लष्करी क्षमतेचा तुलनात्मक अभ्यास करून हा निष्कर्ष नोंदविला आहे. चीनच्या सीमेवर भारत सुमारे सव्वा दोन लाख सैन्य तैनात करु शकतो. तर चीन दोन लाख ३० हजार सैन्य या सीमेवर तैनात करु शकतो, असे दावे केले जातात. पण या दाव्यात तथ्य नसल्याचे या अभ्यासकांचे म्हणणे आहे. तसेच या क्षेत्रातील दोन्ही देशांच्या हवाई दलाच्या क्षमतेत तफावत असल्याचा दावा या शोधनिबंधात करण्यात आला आहे. चीनकडे चौथ्या श्रेणीतील १०१ लढाऊ विमाने आहेत. तर भारताकडील अशा लढाऊ विमानांची संख्या १२२ इतकी आहे. तसेच भारतीय वैमानिकांना या क्षेत्राचा अधिक अनुभव असून त्यांच्याकडे अधिक कौशल्यही आहे, असा दावा या दोन अभ्यासकांनी सदर शोधनिबंधात केला आहे.
भारताचे माजी लष्करी अधिकारी व सामरिक विश्लेषक देखील १९६२ सालच्या व आजच्या भारतामध्ये फरक असल्याची बाब लक्षात आणून देत आहेत. मुख्य म्हणजे भारतीय लष्कराला युध्दाचा व युद्धकाळातील परिस्थिती हाताळण्याचा पर्याप्त अनुभव आहे. पण गेल्या कित्येक वर्षात चीनचे लष्कर ही एकही युद्ध लढलेले नाही, याकडे भारताचे माजी लष्करी अधिकारी लक्ष वेधत आहेत. तसेच मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणाऱ्या भारतीय सैनिकांचे मनोबल अत्यंत उच्चकोटीचे आहे. पण ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’वर निष्ठा ठेवून लढणाऱ्या चिनी जवानांचे मनोबल व आत्मविश्वास या दर्जाचे असू शकत नाही, याचाही दाखला दिला जातो. तसेच आंतरराष्ट्रीय जनमत लोकशाहीवादी भारताच्या बाजूने असून याची पुरेपूर जाणीव असलेला चीन भारताबरोबर उघडपणे लष्करी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करील. मात्र भारताने आपल्या या विश्वासघातकी शेजारी देशांच्या बाबतीत सावधच राहिलेले बरे, असे माजी लष्करी अधिकारी व सामरिक विश्लेषकांचे म्हणणे आहे.