अफगाणिस्तानात ‘अल-कायदा’ असेपर्यंत अमेरिकेने सैन्य माघार घेऊ नये

वॉशिंग्टन – ‘अल-कायदा’ अफगाणिस्तानात असेपर्यंत अमेरिकेने सैन्य माघार घेऊ नये, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे टॉप जनरल केन्थ मॅकेग्नझी यांनी बजावले आहे. वॉशिंग्टनमधल्या एका थिंक टँकने आयोजित केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघाने अफगाणिस्तानच्या संघर्षावर अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात अफगाणिस्तानमध्ये ‘अल-कायदा’ चे ६०० दहशतवादी सक्रीय असल्याचे सांगितले होते. तसेच तालिबान ‘अल-कायदा’ ला सहाय्य करीत असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर जनरल मॅकेग्नझी यांनी हा सल्ला दिला आहे.

अल-कायदा, अफगाणिस्तान, अमेरिका

२९ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतीकरार पार पडला होता. या करारानुसार अमेरिका अफगाणिस्तानातून सैन्य माघार घेणार होती. पण या करारानंतरही अफगाणिस्तानातील तालिबानचे हल्ले कमी झाले नाहीत. यानंतर सैन्य माघारीबाबत फेरविचार करण्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत.

अमेरिकेला ‘अल-कायदा‘कडून मोठा धोका आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात ‘अल-कायदा’ असेपर्यंत अमेरिकेने इथले सैन्य माघारी घेऊ नये, असे जनरल मॅकेग्नझी यांनी बजावले. जोपर्यंत अफगाणिस्तानात सक्रीय असलेल्या दहशतवादी संघटना तिथल्या भूमीचा वापर अमेरिकेच्या विरोधात करतात, तोपर्यंत अफगाणिस्तानमध्ये सैन्यतैनाती कायम राहील, असे अमेरिकेचे धोरण आहे, याची आठवण जनरल मॅकेग्नझी यांनी यावेळी करुन दिली.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेकडून सैन्य माघारी घोषणा केली होती खरी पण काहीही झाले तरी अमेरिका अफगाणिस्तानातून संपूर्ण सैन्य माघार घेणार नाही, असे सामरिक विश्लेषक आधीपासूनच सांगत आले आहे. फार फार तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अफगाणिस्तानातील अमेरिकन सैन्यांची कपात करु शकतील. याद्वारे इथल्या लष्करी मोहिमांद्वारे होणारा खर्च कपात करु शकतील. पण याच्या पलीकडे जाऊन व्यूहरचनात्मक दृष्टया अत्यंत महत्त्वाचा असलेल्या अफगाणिस्तानातील सैन्य माघारी घेणे अमेरिकेला परवडणारे नसेल, असे सामरिक विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यातच तालिबानने दहशतवादी हल्ल्यांचे सत्र सुरु ठेवून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या सैन्यमाघारीच्या निर्णयावर फेरविचार करण्यास भाग पाडल्याचे दावे प्रसिद्ध होऊ लागले आहेत. यामुळे अफगाणिस्तानातील अमेरिकेची सैन्यमाघार इतक्यात तरी दृष्टिपथात नाही.

leave a reply