जगभरात कोरोनाच्या रूग्णांची संख्या ७६.५ लाखांवर

वॉशिंग्टन – जगभरात कोरोनाच्या बळींची संख्या सव्वाचार लाखांच्या पुढे पोहोचली असून एकूण रुग्ण संख्या ७६.५ लाखांवर गेली आहे. दोन दिवसात जगभरात ७७४० जणांचा बळी गेला आहे, तर रुग्णांची संख्या २ लाख १४ हजारांनी वाढली आहे. अमेरिकेतील रुग्ण संख्या २१ लाखांजवळ पोहोचली आहे. युरोप आणि अमेरिकेत या साथीचा वेग मंदावला असला, तरी लॅटिन अमेरिका, आफ्रिकन देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडण्याचा वेग वाढला आहे.

कोरोना, कोरोनाच्या रूग्णांची संख्या

जगभरात कोरोनाव्हायरसचे ७६,६१, ९३७ रुग्ण आढळले असून चोवीस तासात सुमारे ८० हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच या साथीमुळे दगावलेल्यांची संख्या २,४८९ ने वाढून ४,२५,५७५ वर पोहोचली आहे, अशी माहिती ‘वर्ल्डओमीटर’ या वेबसाईटने दिली आहे. जगभरात ३८,७६,२९६ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. अमेरिकेत ७,७०४ नवे रुग्ण आढळले, ब्रिटनमध्ये १५४१ नव्या रुग्णांची नोंद झाली. जवळजवळ सर्वच युरोपीय देशात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचा आणि या साथींच्या बळींच्या संख्येचा दर दिवशीचा आलेख खाली आला आहे.

कोरोना, कोरोनाच्या रूग्णांची संख्या

मात्र लॅटिन अमेरिका, आफ्रिकन आणि काही आशियाई देशात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचा आलेख वेगाने वाढत आहे. रशियात चोवीस तासात सुमारे ९ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. पाकिस्तानात साडेसहा हजार नवे रुग्ण आढळले आहेत. आफ्रिकन देशांमधील रुग्णांची संख्या सव्वा दोन लाखांवर पोहोचली आहे. गेल्या १९ दिवसात आफ्रिकन देशांमध्ये एक लाख नव्या रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत ५ हजार ७५६ मृत्यू झाले आहेत. यातील २५ टक्के रुग्ण एकट्या दक्षिण आफ्रिकेत आढळले आहेत, तर इजिप्तमध्ये सार्वधिक बळींची नोंद झाली आहे. आफ्रिकन देशांमध्ये रुग्णांची संख्या जगातील इतर देशांच्या तुलनेने कमी असली, तरी येथे कोरोना वेगाने फैलावत असल्याचा इशारा जगातिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

leave a reply