अफगाणिस्तानातून आलेल्या टोळधाडीने पाकिस्तानातील पिके फस्त केली

इस्लामाबाद – शुक्रवारी अफगाणिस्तानातून पाकिस्तानात शिरलेल्या टोळधाडीने पाकिस्तानच्या खैबर पख्तनुवाला प्रांतातील शेत फस्त करुन टाकले. कोरोनाव्हायरसच्या साथीपेक्षाही पाकिस्तानसाठी टोळधाडीची समस्या अधिक भयंकर ठरत असल्याचे दावे केले जात होते. आता अफगाणिस्तानातून आलेल्या या टोळधाडीने पाकिस्तान सरकार समोरच्या चिंता अधिकच वाढल्या आहेत.

टोळधाडीने, पाकिस्तानातील पिके, अफगाणिस्तान

अफगाणिस्तानातून आलेल्या टोळधाडीने पाकिस्तानच्या खैबर पख्तनुवालामधल्या डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील शेती फस्त केली. नुकसानीची माहिती प्रसिद्ध झालेली नाही. पण या टोळधाडीने डेरा इस्माईल खानमधल्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याचे सांगितले जाते. तसेच पुढच्या आठवड्यात इराणमधूनही बलोचिस्तानमध्ये टोळधाड येईल, असे दावे केले जातात.

आधीच बलोचिस्तानच्या 33 जिल्ह्यांना टोळधाडीचा फटका बसला आहे. यामुळे बलोचिस्तानमधली 85,000 हेक्टर इतक्या शेतीचे नुकसान झाले आहे. असे असताना यातल्या केवळ 500 हेक्टर शेत जमिनीवर पिकांवर फवारणी झालेली आहे. या टोळधाडीने पाकिस्तानची दोन कोटी 30 लाख हेक्टर इतकी शेती फस्त करून टाकली आहे. यामुळे पाकिस्तानचे शेतकरी हवालदिल बनले आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या जनतेला अजब सल्ला दिला आहे. टोळ पकडून तिला मारुन ते किलोच्या दरात पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांना विकावे, असे सुचविले आहे. त्यांच्या या सल्ल्याची पाकिस्तानातून खिल्ली उडविली जात आहे. दरम्यान, भारतातल्या काही राज्यांना टोळधाडीचा फटका बसला आहे. पण या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताला यश आले होते. या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानसमोर मदतीचा प्रस्ताव दिला होता. पण अद्याप पाकिस्तानने भारताचा हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही. येत्या 18 जून रोजी उभय देशांमध्ये या संर्दभात चर्चा पार पडणार असल्याचे सांगितले जाते.

leave a reply