पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त

- दोन दहशतवाद्यांना अटक

अमृतसर – पाकिस्तानची कुख्यात दहशतवादी संघटना ‘आयएसआय’च्या सहाय्याने सक्रिय असलेले खलिस्तानवादी दहशतवाद्याचे मॉड्यूल पंजाब पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. गेल्या दोन वर्षात पंजाबमध्ये सुमारे ३० ‘टेरर मॉड्यूल’ नष्ट करण्यात आली असून १०० हुन अधिक दहशतवादी पकडले गेले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी सुरक्षादलांच्या हातून मारले जात असताना हताश झालेला पाकिस्तान पंजाबमध्ये दहशतवाद पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.

Punjab Terror Attackपंजाब पोलिसांनी अमृतसरजवळच्या एका ढाब्यावर छापा टाकून गुरमीत सिंग आणि विक्रम सिंग या दोन खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून जर्मन बनावटीचे एक ‘एमपी-५ सब-मशीन गन’, नऊ एमएम पिस्तुल, चार मॅगझिन, आणि दोन मोबाईल पोलिसांनी जप्त केले. याशिवाय दोघे पाकिस्तानातील हस्तकांच्या संपर्कात होते. त्यांच्या मोबाईलमधून संशयित संभाषण यासह काही फोटोग्राफ पोलिसांना सापडले आहेत.

पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला चढविण्याच्या सूचना या दहशतवाद्यांना सीमेपलीकडून देण्यात आल्या होत्या, अशी माहिती पंजाबचे डीजीपी दिनकर गुप्ता यांनी दिली आहे. गुरमीत आयएसआयच्या हस्तकांच्या संपर्कात होता. तीन वर्षांपूर्वी आपण पाकिस्तानला जाऊन आल्याचे गुरमीतने चौकशीत मान्य केले आहे. गुरमीत पाकिस्तानमध्ये कोणाची भेट घेतली याचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुरमीत व विक्रम सिंग यांच्यावर आयपीसी, शस्त्रास्त्र कायदा आणि यूएपीएच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

leave a reply