‘गरीब कल्याण रोजगार अभियान’चा शुभारंभ

Garib-Kalyan-Rojgarनवी दिल्ली – शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’चा शुभारंभ केला. लॉकडाऊननंतर देशातील स्थलांतरित मजूर विविध शहरांमधून आपल्या मूळ गावी परतले आहेत. ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’अंतर्गत या मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देशातल्या बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड, ओडिशा, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यातील ११६ जिल्ह्यांमध्ये हे अभियान सुरु झाले आहे.

लॉकडाऊनंतर आपल्या गावी परतलेल्या जवळपास ६७ लाख मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर या मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’ सुरू करण्यात आले आहे. बिहारच्या खगोरियामधून या योजनेचा शुभारंभ झाला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानचे मुख्यमंत्रीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Garib-Kalyan-Rojgarया अभियानाअंतर्गत मजुरांकडून ग्रामीण घरे, पेयजल आणि स्वच्छता, ग्रामीण रस्ते यासारखी सार्वजनिक कामे करून घेण्यात येणार आहेत. तसेच गावांमध्ये आवश्यक असलेल्या आधुनिक सुविधांची कामे देखील या अभियानाअंतर्गत होणार आहे. याखेरीज महिलांना बचत गटाअंतर्गत जोडले जाईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. या अभियानामुळे मजूर सक्षम बनतील. त्यांना मदतीची याचना करावी लागणार नाही. यामुळे मजुरांना गावातच रोजगार मिळेल आणि गावांचा विकास होईल , असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

यावेळी पंतप्रधानांनी ग्रामपंचायत आणि ग्रामीण संस्था कोरोनाव्हायरसच्या विरोधात देत असलेल्या लढ्याचे कौतुक केले. यावेळी पंतप्रधानांनी आत्मनिर्भर पॅकेज आणि शेतकऱ्यांना दिलेल्या सुविधांची देखील माहिती दिली. कृषीमाल कोठे विकायचा याचा निर्णय घेण्याची मुभा आता शेतकऱ्यांना मिळाली आहे. शिवाय शेतकऱ्याला बाजारपेठेशी थेट जोडण्यासाठी आणि शीतगृहांसाठी आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

leave a reply