मनिला – ’साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात प्रवेश करण्यास किंवा येथे गस्त घालण्यास फिलिपाइन्सने कुणालाही विरोध केलेला नाही. अगदी ब्रिटन, फ्रान्सची जहाजे देखील या क्षेत्रातून प्रवास करतात. हे सागरी क्षेत्र सर्वांसाठी खुले असून भारताने देखील या क्षेत्रात येऊन गस्त घालावी’, असे आवाहन फिलिपाईन्सचे संरक्षणमंत्री डेल्फीन लॉरेंझाना यांनी केले आहे. त्याचबरोबर भारत देखील ‘साउथ चायना सी’च्या क्षेत्रातील गस्तीसाठी उत्सुक असल्याची माहिती लॉरेंझाना यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. संपूर्ण ‘साऊथ चायना सी’चे क्षेत्र आपल्या मालकीचा असल्याचा चीनचा दावा आहे. फिलिपाईन्सने या क्षेत्रात गस्तीसाठी भारताला केलेले हे आवाहन चीनच्या चिंतेत भर घालणारे ठरत आहे.
गेल्या आठवड्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांच्यात फोनवरून चर्चा झाली. ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातील फिलिपाईन्स बरोबरचे धोरणात्मक सहकार्य व्यापक करण्यावर या चर्चेत दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. फिलिपाईन्स इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भारताचा महत्त्वाचा सहकारी देश असल्याची प्रतिक्रिया यावेळी भारताच्या पंतप्रधानांनी दिली होती. तर भारताने या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पाडावी, असे आवाहन फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी केले होते. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये झालेल्या या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, फिलिपाईन्सचे संरक्षणमंत्री लॉरेंझाना यांनी भारताला ‘साऊथ चायना सी’तील गस्तीसाठी आवाहन केले आहे.
‘साऊथ चायना सी’चे क्षेत्र सर्वांसाठी खुले असल्याचे सांगून फिलिपाईन्सच्या संरक्षणमंत्र्यांनी या क्षेत्रावर चीन करीत असलेल्या दाव्याला आव्हान दिले. गेल्या काही दिवसांपासून फिलिपाईन्सने भारताबरोबरच्या सहकार्याला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. गेल्याच आठवड्यात फिलिपाईन्सच्या नौदलप्रमुखांनी दोन्ही देशांमधील नौदल सहकार्य येत्या काळात अधिक महत्त्वाचे ठरेल, अशी प्रतिक्रिया दिली होती. तर दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर फिलिपाईन्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात युद्धसराव करणाऱ्या चीनला इशारा दिला होता. ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात युद्धसराव करणाऱ्या चीनच्या जहाजांनी आपल्या क्षेत्रात प्रवेश केलाच तर त्याला भीषण प्रत्युत्तर मिळेल, असे फिलिपाईन्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले होते.
दरम्यान, याआधी व्हिएतनामनेही भारताला ‘साऊथ चायना सी’मधील गस्त तसेच इंधनक्षेत्राच्या उत्खननासाठी आवाहन केले होते. तर गेल्या वर्षी भारत, अमेरिका, फिलिपाईन्स आणि जपान यांच्या युद्धनौकांनी या सागरी क्षेत्रात संयुक्त युद्धसरावही केला होता. या युद्धसरावावर चीनकडून जोरदार प्रतिक्रिया उमटली होती. अशा परिस्थितीत, फिलिपाईन्सने भारताला केलेले आवाहन लक्षवेधी ठरत आहे.