आशियातील सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे पंतप्रधानांकडून उद्‌घाटन

Solar-Energy-Asiaनवी दिल्ली – शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशच्या रेवामध्ये ७५० मेगा वॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून उद्‌घाटन केले. हा आशियातला सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे वर्षाला १५ लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल. या प्रकल्पाचा लाभ मध्यप्रदेशच्या आदिवासी, गरीब, शेतकरी आणि मध्यमवर्गियांना होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. तसेच यापुढे देशात सोलर पॅनल्सची व सबंधीत साहित्याची आयात कमी केली जाईल आणि भारतातच या साहित्याच्या उत्पादनावर भर देण्यात येईल, असे पंतप्रधान म्हणाले. भारत दरवर्षी १.१८ अब्ज डॉलर्सची सोलर पॅनल्स चीनमधून आयात करतो. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांची ही घोषणा महत्वाची ठरते.

मध्यप्रदेश उर्जा विकास निगम आणि भारतीय सौरऊर्जा निगम यांनी संयुक्तरित्या हा प्रकल्प सुरु केला आहे. तसेच तीन खाजगी कंपन्या देखील या प्रकल्पात सहभागी आहेत. ७५० मेगावॅटच्या या प्रकल्पात २५० मेगावॅटचे तीन युनिटस् आहेत. या सौरऊर्जा प्रकल्पातील ७६ टक्के सौरऊर्जा मध्यप्रदेशच्या डिस्कॉम कंपनीला आणि २४ टक्के दिल्लीच्या मेट्रोला मिळणार आहे. दोन रुपये ९७ पैसे प्रति युनिट दराने या सौरऊर्जा प्रकल्पातून वीज पुरवठा होणार आहे. सौरऊर्जा शुअर (विश्वासार्ह), प्युअर ( शुद्ध) आणि सिक्युअर (सुरक्षित) असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल आणि वीजेची बचत होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. तसेच यासारखे अनेक सौरऊर्जा प्रकल्प देशात सुरु होतील, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. यामुळे उद्योग उभारुन रोजगाराला चालना मिळेल, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.

Solar-Energy-Asiaआत्मनिर्भर अभियानाअंतर्गत देशातच सोलर पॅनल्स आणि बॅटरी तयार करण्यावर भर देण्यात येईल. आयात कमी करण्यात येईल. सरकारी विभाग यापुढे सौर प्रकल्पासाठी संबंधित ‘मेक इन इंडिया’ साहित्याचीच खरेदी करतील, असे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले. तसेच शेतातच सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी योजना सुरु केल्या जात असल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. भारताच्या अपांरपरिक ऊर्जा स्त्रोत प्रकल्पांंकडे सारे जग मॉडेल म्हणून पाहत आहे. भारत जगाशी ‘इंटरनॅशनल सोलर अलायन्स’ अंतर्गत जोडला असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

leave a reply