कोलंबो/ नवी दिल्ली – श्रीलंकेच्या पूर्व किनाऱ्यावर ऑईल टँकरला लागलेली आग विझवण्यासाठी भारतीय नौदलाने केलेल्या सहकार्यासाठी श्रीलंकेने भारताचे आभार मानले आहेत. आम्हाला भारताकडून सहाय्य मिळत असून त्याबद्दल आभारी आहोत, असे श्रीलंकेचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल शवेंद्र सिल्वा म्हणाले. कुवेतहून भारताकडे इंधन घेऊन येत असताना श्रीलंकन किनारपट्टीनजिक ‘न्यू डायमंड’ नावाच्या तेलवाहू जहाजाला जहाजाला आग लागली होती. जहाजावरील २२ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
इंडियन ऑईलचे ‘न्यू डायमंड’ हे तेलवाहू जहाज कुवेतहून कच्चे तेल घेऊन भारताकडे येत होते. जहाजात २ लाख ७० हजार मेट्रिक टन इंधन होते. गुरुवारी जहाज श्रीलंकेच्या ‘संगमनकंदा’नजिक असताना अचानक इंजिन रुममध्ये आग लागली. त्यानंतर जहाजावर ही आग फैलावत गेली. दुर्घटनेची माहिती मिळताच श्रीलंकन नौदल आग विझवण्यासाठी रवाना झाले होते. मात्र आगीचे एकंदरीत स्वरूप नियंत्रणाबाहेर असल्याचे लक्षात येताच श्रीलंकेने भारताकडे मदतीची मागणी केली.
त्यानंतर भारतीय नौदलाने तातडीने आपली विनाशिका ‘आयएनएस सह्याद्री’ आग विझवण्यासाठी श्रीलंकन नौदलाच्या सहाय्यासाठी रवाना केली. त्याचबरोबर तटरक्षकदलाची ‘आयसीजी शौर्य’, ‘सारंग’ ‘समुद्र पहरेदार’ ही तीन जहाजे व एक डॉर्निअर एअरक्राफ्ट देखील या मदत व बचावकार्यासाठी धाडण्यात आल्याचे तटरक्षकदलातर्फे सांगण्यात आले.
गुरुवारी लागलेली आग शुक्रवारी आटोक्यात आणण्यात यश आले. जहाजावरील २२ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला. या जहाजावरुन इंधनाची गळती झालेली नसल्याचे श्रीलंकन नौदलाकडून सांगण्यात आले. भारतीय नौदलाबरोबरच श्रीलंकेच्या बंदरात असणाऱ्या रशियन जहाजाकडूनही मदत घेण्यात आल्याची माहिती श्रीलंकेने दिली आहे.