सौदीनंतर बाहरिननेही इस्रायलसाठी हवाई क्षेत्र खुले केले

मनामा – ‘संयुक्त अरब अमिरात’साठी (युएई) उड्डाण करणार्‍या इस्रायली विमानांना आपली हवाई हद्द खुली करण्याची घोषणा बाहरिनने केली. यामुळे इस्रायल आणि युएईतील हवाई अंतर कमी झाल्याचे समाधान दोन्ही देशांकडून व्यक्त केले जाते. दोन दिवसांपूर्वी सौदी अरेबियाने इस्रायली विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र खुले केले होते. अमेरिका आणि इस्रायलने सौदीच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. दरम्यान, सौदीने आपली हवाई हद्द इस्रायलच्या विमानांसाठी मोकळी केल्यामुळे इराणवरील इस्रायलच्या हवाई हल्ल्यांचा पर्याय खुला झाल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

हवाई क्षेत्र

युएई’साठी प्रवास करणार्‍या प्रत्येक विमानाला यापुढे बाहरिनच्या हवाई हद्दीचा वापर करता येईल, असे बाहरिनच्या पर्यटन मंत्रालयाने काही तासांपूर्वी जाहीर केले. युएई’ने केलेल्या मागणीनंतर हा निर्णय घेतल्याचे बाहरिनने स्पष्ट केले. बाहरिनने यावेळी इस्रायलचा थेट उल्लेख करण्याचे टाळले. पण आतापर्यंत बाहरिनच्या हवाई हद्दीत इस्रायल वगळता प्रत्येक देशाच्या विमानाला परवानगी होती. त्यामुळे बाहरिनची सदर घोषणा इस्रायलसाठी होती, असे म्हटले जाते. दोन दिवसांपूर्वी सौदी अरेबियाने देखील इस्रायलचा उल्लेख टाळून आपली हवाई हद्द प्रत्येक देशासाठी मोकळी असल्याचे घोषित केले होते. सौदी आणि बाहरिन यांच्या या निर्णयामुळे इस्रायल आणि युएईमधील हवाई अंतर सात तासांहून तीन तासांवर आल्याचे समाधान व्यक्त केले जाते.

हवाई क्षेत्रगेल्या महिन्यात इस्रायल आणि युएईमध्ये ऐतिहासिक सहकार्य करार पार पडला असून या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या शिष्टमंडळाने सोमवारी युएईला भेट दिली होती. युएई वगळता सौदी अरेबिया, बाहरिन किंवा इतर कुठल्याही अरब देशाने इस्रायलसोबत असा करार केलेला नाही. पण या दोन्ही देशांचे ऐतिहासिक निर्णय अघोषित सहकार्याचे संकेत देत असल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. काही दिवसांपूर्वी बाहरिनने इस्रायल आणि युएईतील सहकार्याचे स्वागत केले होते. तसेच युएईनंतर बाहरिन देखील लवकरच इस्रायलसोबत सहकार्य प्रस्थापित करील, असा दावा अमेरिका व इस्रायली माध्यमांनी केला होता.

दरम्यान, सौदी आणि बाहरिनने इस्रायलला हवाई हद्द मोकळी करुन देण्याचा निर्णय अतिशय महत्वाचा असल्याचा दावा केला जातो. इस्रायलप्रमाणे सौदी, युएई, बाहरिन या अरब देशांचा इराण हा समान शत्रू आहे, याकडे इस्रायली व आखाती माध्यमे लक्ष वेधत आहेत. इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी इस्रायलने हवाई हल्ल्याचे संकेत काही वर्षांपूर्वीच दिले होते. यासाठी इस्रायल सिरिया-इराक त्याचबरोबर जॉर्डन-सौदीच्या हवाईहद्दीचा वापर करू शकतो, असा इशाराही इस्रायली विश्लेषकांनी दिला होता. तर युरोपातील काही लष्करी विश्लेषकांनी देखील इराणवरील हल्ल्यासाठी इस्रायली विमानांना सौदी आपली हवाई हद्द वापरू देईल, असे दावे केले होते.

leave a reply