परकीय गुंतवणूकदार भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास दाखवत आहेत

- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

नवी दिल्ली – परकीय गुंतवणूकदार भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करीत आहेत. यामुळेच कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळातही भारतात २० अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आली आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.

गुंतवणूकदार

भारत सरकार परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक त्या आर्थिक सुधारणा करण्यासाठीसाठी वचनबद्ध आहे. सरकार यादृष्टीने सतत प्रयत्नशील असून सरकारकडून उचलण्यात येणाऱ्या पावलांकडे परकीय गुंतवणूकदार गांभीर्याने पाहत आहेत, असे केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी म्हटले आहे.

परकीय गुंतवणूकदार भारताला गुंतवणूकसाठीचे योग्य ठिकाण मानत असून कोरोनाचा संकटाच्या काळातही आलेली थेट परकीय गुंतवणूक याचे उदाहरण आहे. एप्रिलपासून जुलैपर्यंत भारतात २० अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक आली आहे, याकडे अर्थमंत्री सीतारामन यांनी लक्ष वेधले.

केंद्रीय मंत्री सीतारामन यांनी ‘स्टेट बिजनेस रिफॉर्म ॲक्शन प्लॅन 2019’ च्या आधारावर राज्यांच्या रँकिंग प्रसिद्ध केल्या. शनिवारी जारी करण्यात आलेल्या ‘इज ऑफ डूईंग बिझनेस रँकिंग’मध्ये आंध्र प्रदेशने आपले पहिले स्थान कायम राखले आहे, तर गुणांमध्ये दहा अंकाची वाढ होऊन उत्तरप्रदेशने या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. या यादीत तेलंगणा तिसऱ्या स्थानावर आहे

महाराष्ट्र ‘इज ऑफ डूईंग’ राज्यांच्या यादीत तेराव्या स्थानावर असून कर्नाटक १७ स्थानी आणि गुजरात १० व्या स्थानावर आहे. याशिवाय मध्य प्रदेश पश्चिम बंगाल उत्तराखंड या राज्यांच्या रँकिंगमध्ये ही सुधारणा झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी ॲक्शन प्लॅन लागू करण्यासाठी आणि आर्थिक सुधारण्याच्या दृष्टीने काही राज्यांनी उचललेल्या पावलांचे यावेळी कौतुक केले. आत्मनिर्भर भारत योजनेमुळे देशाच्या आर्थिक क्षमतेत वाढ होण्यास मदत मिळेल, असा विश्वासही अर्थमंत्री सीतारामन यांनी व्यक्त केला.

leave a reply