चीनच्या दडपशाहीविरोधात मंगोलियन जनतेची निदर्शने

मंगोलियनटोकियो – चीनचा स्वायत्त प्रांत असलेल्या इनर मंगोलियात चीन सरकारकडून मँडरीन भाषा लादण्याच्या निर्णयाविरोधात निदर्शने सुरु झाली आहेत. शनिवारी जपानच्या टोकियोमध्येही अनिवासी मंगोलियन नागरिकांनी चीनच्या दूतावासाबाहेर निदर्शने करून चीनची दडपशाही जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. चीन सरकारने नवे भाषा धोरण देशात लागू केले असून स्थानिक भाषेच्या जागी शाळांमधून मँडरीन भाषा सक्तीची करण्यात आली आहे. इनर मंगोलिया या चीनच्या स्वायत्त प्रातांत या धोरणांतर्गत शाळांमध्ये स्थानिक भाषेला डावलून मॅडरीन भाषेत शिकविण्याचे आदेश चीन सरकारने दिले होते.

यावर आता इनर मंगोलियन जनतेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. चीन आपल्या आर्थिक, राजकीय व लष्करी बळाच्या जोरावर इनर मंगोलियातील शाळांमध्ये स्थानिक भाषा, मंगोलियन संस्कृती, पंरपरा नष्ट करीत आहे. तसेच स्वतःची संस्कृती इथल्या जनतेवर जबरदस्तीने लादत आहे, असा आरोप इथली जनता करू लागली आहे. या नव्या धोरणाद्वारे चीन सरकार इनर मंगोलियातील स्थानिक भाषा नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांंनी केला आहे.

या निर्णयाविरोधात इनर मंगोलियातील जनतेने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन सुरू केले आहे. गेल्याच आठवड्यात चीन सरकारच्या निर्णयाविरोधात इनर मंगोलियातील हजारो विद्यार्थ्यांसह पालकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. या आंदोलनाचे पडसाद इतर देशांमध्येही उमटू लागले असून जपानमध्ये झालेली निदर्शने त्याचाच भाग दिसत आहे.

leave a reply