भारताची ‘ओएफबी’ अमेरिकेला दारूगोळा पुरविणार

नवी दिल्ली – भारत सरकारच्या ‘ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड’ला (ओएफबी) आत्तापर्यंतची मोठी ऑर्डर मिळाली असून ‘ओएफबी’ अमेरिकेला दारूगोळा पुरविणार आहे. दारूगोळा व संरक्षण साहित्यांची निर्मिती करणारी देशातील सर्वात जुनी संरक्षण संस्था असलेल्या ‘ओएफबी’ अमेरिकेला ‘५.५६X४५ एमएम नाटो एम१९३ बॉल बुलेट’ची निर्यात करणार आहे.

सध्या देशभरात ओएफबीची ४१ कारखाने, १३ विकास केंद्रे आणि नऊ शिक्षण संस्था कार्यरत आहेत. यापैकी महाराष्ट्रातील ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथे अमेरिकेसाठी आवश्यक दारूगोळा तयार केला जाईल. चालू आर्थिक वर्षात हा दारूगोळा अमेरिकेला पुरविला जाईल, असे ‘ओएफबी’चे उपमहासंचालक गगन चतुर्वेदी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. देशातील ‘ओएफबी’ कारखाने परदेशांना दारुगोळा निर्यात करत आहेत आणि दिलेल्या मुदतीत त्याची पूर्तता करीत आहेत.

अमेरिकेच्या लष्कर, नौदल आणि हवाईदल वापरत असलेल्या रायफल्समध्ये याचा वापर केला जाणार आहे. ‘५.५६X४५ एमएम नाटो एम१९३ बॉल बुलेट’ या रायफल्समध्ये वापरल्या जाणार्‍या या दारूगोळ्यांचा अमेरिकेसह नाटोसंलग्न देशांच्या लष्कराकडून तसेच जपान, दक्षिण कोरिया, तैवान आणि ऑस्ट्रेलियन लष्कराकडूनही केला जातो.

दरम्यान, ‘ओएफबी’च्या कॉर्पोरेटायझेशनसाठी सरकारचे प्रयत्‍न सुरू असून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. सध्या ‘ओएफबी’ची वार्षिक उलाढाल १२,००० कोटी रुपयांच्या आसपास असून कॉर्पोरेटायझेशनंतर पुढील चार वर्षात ‘ओएफबी’ची वार्षिक उलाढाल ३०,००० कोटी रुपयांपर्यंत वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.

leave a reply