कॅनबेरा – ऑस्ट्रेलिया सरकारने दहशतवादी हल्ल्याचा कट आखणाऱ्या अब्दुल नासेर बेनब्रिका या अल्जिरियन वंशाच्या व्यक्तीचे नागरिकत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत मंजूर झालेल्या दहशतवादविरोधी कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री पीटर डटन यांनी या कारवाईची माहिती दिली. ऑस्ट्रेलियन जनतेच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते, असे डटन यांनी म्हटले आहे. बेनब्रिकाकडे ऑस्ट्रेलिया व अल्जेरिया अशा दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे.
गेल्या दशकभरात ऑस्ट्रेलियात कट्टरपंथियांची संख्या व कारवायांची व्याप्ती वाढताना दिसत आहे. त्याविरोधात ऑस्ट्रेलिया सरकारकडून आक्रमक कारवाईही हाती घेण्यात आली आहे. त्यात कठोर तरतुदी असणारे कायदे व सुरक्षायंत्रणांचे बळ वाढविणे यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाच्या संसदेत गेल्या वर्षी दहशतवाद्यांचे नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भात कडक कायदा करण्यात आला होता. त्यानुसार, दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या तसेच दहशतवादाच्या मुद्यावरून शिक्षा झालेल्याचे नागरिकत्व रद्द करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिकार थेट गृहमंत्र्यांकडे देण्यात आलेले आहेत. अल्जिरियन वंशाच्या बेनब्रिका यांचे नागरिकत्व रद्द करण्याचा निर्णयही गृहमंत्री पीटर डटन यांनीच घेतल्याचे सांगण्यात येते. नागरिकत्व रद्द झाल्यानंतर बेनब्रिका यांची अल्जिरियात हकालपट्टी करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या बेनब्रिका तुरुंगात शिक्षा भोगत असून कालावधी पूर्ण झाल्यावर माघारी पाठविण्यात येणार आहे.
अब्दुल नासेर बेनब्रिका 1989 सालापासून ऑस्ट्रेलियात वास्तव्यास आहे. मेलबर्न तसेच सिडनीमधील महत्त्वाच्या जागांवर दहशतवादी हल्ल्याचा कट आखल्याबद्दल 2005 साली त्यांना अटक करण्यात आली होती. कटात स्टेडियम व क्लबसह अणुप्रकल्पाचाही समावेश होता, अशी माहिती ऑस्ट्रेलियन सुरक्षायंत्रणांनी अटकेदरम्यान दिली होती. बेनब्रिका यांनी आपल्या समर्थकांसह स्वतंत्र गट तयार करून दहशतवादी हल्ल्याची आखणी केली होती. स्फोटके बनविण्यासाठी लागणाऱ्या घटकांची खरेदी करण्याची तयारीही झाली होती. कट प्रकरणात बेनब्रिका यांच्यासह 16 जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
ऑस्ट्रेलियात गेल्या सहा वर्षात आठ दहशतवादी हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमागे ‘अल कायदा’ व ‘आयएस’ हा दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे समोर आले होते. ‘आयएस’साठी आखाती देशांमध्ये गेलेले काही संशयित दहशतवादी ऑस्ट्रेलियात परत आल्याचे व त्यांनी नव्या हल्ल्यांचे कट आखल्याचेही उघड झाले आहे. बेनब्रिका यांच्याशी निगडित असलेल्या काही संशयितांचाही यात समावेश आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात झालेली कारवाई महत्त्वाची ठरते.