‘सी ऑफ जपान’मध्ये अमेरिकी विनाशिकेचे रशियाला आव्हान

‘सी ऑफ जपान’वॉशिंग्टन/मॉस्को – गेले काही महिने ‘साऊथ चायना सी’मध्ये युद्धनौका पाठवून चीनच्या कारवायांना आव्हान देणाऱ्या अमेरिकेने आता रशियालाही इशारा दिला आहे. मंगळवारी आशिया-पॅसिफिक क्षेत्राचा भाग असलेल्या ‘सी ऑफ जपान’मध्ये अमेरिकी विनाशिकेने रशियन सागरी हद्दीनजिक प्रवास केला. रशियन युद्धनौकांनी अमेरिकी विनाशिकेचा पाठलाग करून पिटाळून लावल्याचा दावा रशियन संरक्षण विभागाने केला आहे. यापूर्वी भूमध्य सागरी क्षेत्र तसेच ‘ब्लॅक सी’मध्ये अमेरिका व रशियाच्या युद्धनौका तसेच लढाऊ विमानेही आमनेसामने येण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र पॅसिफिक क्षेत्रात अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मंगळवारी पहाटे अमेरिकेची प्रगत विनाशिका ‘युएसएस जॉन मॅक्कॅन’ जपान व रशियामध्ये असलेल्या ‘सी ऑफ जपान’मधून प्रवास करीत होती. या सागरी क्षेत्राचा भाग असलेल्या ‘पीटर द ग्रेट गल्फ’ भागातून प्रवास करीत असताना रशियाच्या युद्धनौकांनी अमेरिकी विनाशिकेला माघारी जाण्याचा इशारा दिला. अमेरिकी विनाशिका रशियाच्या सागरी हद्दीपासून दोन किलोमीटर अंतरावर असताना, ‘ॲडमिरल विनोग्रॅडव्ह’ या रशियन युद्धनौकेने आपला मोर्चा अमेरिकी विनाशिकेच्या दिशेने वळविला. त्यानंतर अमेरिकी विनाशिकेने माघार घेतली, असा दावा रशियाकडून करण्यात आला. अमेरिकी विनाशिकेच्या आक्रमक हालचालींनंतर रशियाने आपली दुसरी युद्धनौका ‘सॉव्हरशेनी’ त्याच्या मागावर धाडल्याचेही रशियाकडून सांगण्यात आले.

‘सी ऑफ जपान’

रशियाचे हे दावे अमेरिकेने स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. ‘रशियाकडून देण्यात आलेली माहिती पूर्णपणे चुकीची आहे. युएसएस जॉन मॅक्कॅनला कोणत्याही देशाच्या हद्दीतून बाहेर पिटाळण्यात आलेले नाही. अमेरिकी युद्धनौका आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, फ्रीडम ऑफ नॅव्हिगेशन मोहीम राबवित होती. अमेरिका कोणत्याही देशाने टाकलेल्या दडपणासमोर झुकणार नाही. त्याचवेळी सागरी हद्दीबाबत करण्यात येणारे बेकायदेशीर दावेही स्वीकारले जाणार नाहीत. या प्रकरणात रशियाने हेच प्रयत्न केल्याचे दिसते. सागरी वाहतुकीचे स्वातंत्र्य व सागरी क्षेत्रातील नियमांबाबत अमेरिका वचनबद्ध आहे’, अशा शब्दात अमेरिकी नौदलाने रशियाला प्रत्युत्तर दिले.

‘सी ऑफ जपान’19व्या शतकात चीनविरोधात झालेल्या युद्धानंतर रशियाने ‘सी ऑफ जपान’मधील मोठे सागरी क्षेत्र ताब्यात घेतले होते. त्याला ‘पीटर द ग्रेट गल्फ’ असे नाव देऊन त्यावर आपला ऐतिहासिक अधिकार आहे, असा दावा त्यानंतर रशियाने केला होता. गेल्या शतकात रशियाने या सागरी क्षेत्राची व्याप्ती अधिक वाढविण्याचा प्रयत्न केला होता. या भागात रशियाने आपल्या ‘पॅसिफिक फ्लीट’ची उभारणी करून मोठ्या प्रमाणावर संरक्षण तैनाती केली आहे. मात्र अमेरिकेने रशियाचा अधिकार नाकारला असून आंतरराष्ट्रीय चौकटीच्या बाहेर करण्यात आलेले दावे स्वीकारणार नसल्याचे बजावले आहे.

यापूर्वी अमेरिकेने या क्षेत्रात आपली युद्धनौका पाठविलेली नाही. मात्र जपानमध्ये असलेल्या अमेरिकी संरक्षणतळावरून अमेरिकेची टेहळणी विमाने तसेच ‘बॉम्बर्स’ या क्षेत्रानजिक घिरट्या घालतात, असे सांगण्यात येते. गेल्या काही वर्षात अमेरिकेने ‘इंडो-पॅसिफिक’वर आपले लक्ष केंद्रीत केले असले तरी त्याचा रोख चीनच्या कारवायांचे केंद्र असलेल्या ‘साऊथ चायना सी’मध्ये राहिला आहे. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता, अमेरिकी युद्धनौकेने रशियन हद्दीनजिक केलेला प्रवास लक्ष वेधून घेणारा ठरतो.

leave a reply