अथेन्स/अंकारा – तुर्कीकडून भूमध्य सागरी क्षेत्रात सुरू असलेल्या कारवाया रोखण्यासाठी ग्रीसने आपल्या संरक्षणखर्चात तब्बल ५७ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी ग्रीसच्या संसदेने या वाढीला मंजुरी दिली असून २०२१ साली ग्रीस संरक्षणदलांवर ६.६ अब्ज डॉलर्स खर्च करणार आहे. या खर्चात संरक्षणदलातील जवानांची संख्या वाढविण्याबरोबरच फ्रान्सकडून ‘रफायल’ लढाऊ विमानांची खरेदी तसेच ड्रोन्स, विनाशिका व इतर संरक्षणयंत्रणांचा समावेश आहे.
भूमध्य सागरी क्षेत्रातील इंधनाच्या साठ्यांवरून तुर्कीने आक्रमक भूमिका घेतली असून ग्रीसच्या हद्दीतील साठ्यांवरही आपलाच अधिकार असल्याचे दावे केले आहेत. आपला दावा भक्कम करण्यासाठी गेल्यावर्षी तुर्कीने लिबियाबरोबर एक करारही केला होता. त्यानंतर गेल्या तीन महिन्यात तुर्कीने इंधनाच्या सर्वेक्षणासाठी सातत्याने आपली जहाजे ग्रीसच्या सागरी हद्दीजवळ पाठवून चिथावणी देण्याचा प्रयत्न केला होता. तुर्कीच्या या कारवायांना ग्रीसनेही जोरदार प्रत्युत्तर दिले असून युरोपिय देशांसह अमेरिका, इजिप्त व संयुक्त अरब अमिरात (युएई) या देशांनीही ग्रीसची बाजू घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्रीसला मिळालेले समर्थन आणि युरोप तसेच अमेरिकेने टाकलेले दडपण यामुळे तुर्कीला या मुद्यावर माघार घेणे भाग पडले आहे. मात्र यापूर्वी तुर्कीने केलेल्या कारवाया व चिथावणीखोर भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ग्रीसने तुर्कीला ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी आपली संरक्षणसज्जता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांपूर्वी ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकीस यांनी संरक्षणदलांची सिद्धता वाढविण्यासाठी व्यापक कार्यक्रमाची घोषणा केली होती. संरक्षणखर्चात केलेली तब्बल ५७ टक्क्यांची वाढ याच कार्यक्रमाच्या पूर्ततेसाठी उचलेले पाऊल असल्याचे सांगण्यात येते.
२०२१ साली ग्रीस आपल्या संरक्षणदलांसाठी ६.६ अब्ज डॉलर्स खर्च करणार असून ही रक्कम ‘जीडीपी’च्या सुमारे तीन टक्क्यांपर्यंत असेल, असे सांगण्यात येते. फ्रान्सबरोबर करण्यात येणारा १८ रफायल लढाऊ विमानांचा करार संरक्षणखर्चातील सर्वात महत्त्वाची तरतूद ठरणार आहे. येत्या काही दिवसात करारावर स्वाक्षर्या होणार असून त्यातील आठ लढाऊ विमाने २०२१ साली ग्रीसच्या हवाईदलात सामील होतील, अशी माहिती पंतप्रधान मित्सोटाकीस यांनी दिली. त्याव्यतिरिक्त विनाशिका, नेव्ही हेलिकॉप्टर्स, अँटी टँक वेपन्स, नेव्ही टोर्पेडोज व प्रगत हवाई क्षेपणास्त्रे यांच्या खरेदीची प्रक्रियाही सुरू करण्यात येणार आहे.
फ्रान्सच्या रफायल विमानांव्यतिरिक्त अमेरिकेकडून ‘एफ-३५’ लढाऊ विमानांच्या खरेदीसाठीही ग्रीसने हालचाली सुरू केल्या आहेत. विमानांची संख्या निश्चित झाली नसली तरी किमान सहा ते आठ लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी बोलणी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.