युरोपमध्ये कोरोनाच्या साथीची तीव्रता वाढली

- इटलीतील बळींची संख्या ६५ हजारांवर

ब्रुसेल्स/रोम – गेल्या काही दिवसात युरोपातील कोरोनाचे रुग्ण व बळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी युरोपातील तीन आघाडीच्या देशांमध्ये ५६ हजारांहून अधिक रुग्ण नोंदविण्यात आले असून जवळपास दीड हजार जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीत सोमवारी २४ तासांमध्ये ४९१ बळींची नोंद झाली असून एकूण बळींची संख्या ६५ हजारांवर गेली. याच पार्श्‍वभूमीवर, ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) युरोपात कोरोनाची तिसरी लाट येत असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त देण्यात आले आहे.

जगभरात कोरोना साथीच्या रुग्णांची एकूण संख्या सात कोटी, ४२ लाख, ८८ हजार, १९६ झाली असून एकूण १६ लाख, ५० हजार, ३०१ जण दगावले आहेत. अमेरिकेतील ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन’ने ही माहिती दिली आहे. अमेरिकेतील बळींची संख्या तीन लाखांवर गेली असून युरोप व लॅटिन अमेरिकेतही साथीत दगावणार्‍यांचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. युरोपात हा वेग जास्त असून ‘लॉकडाऊन’ व इतर निर्बंध लागू असतानाही रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

१० लाख व त्याहून जास्त कोरोना रुग्ण नोंदविण्यात आलेल्या देशांमध्ये युरोपातील सहा देशांचा समावेश आहे. त्यात पोलंड, जर्मनी, स्पेन, फ्रान्स, ब्रिटन व इटली या देशांची नावे आहेत. तर ५० हजार व त्याहून अधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत तीन युरोपिय देश असून त्यात इटलीसह ब्रिटन व फ्रान्सचा समावेश आहे. युरोपमध्ये कोरोनाच्या साथीची सुरुवात इटलीतून झाल्याचे समोर आले होते. पहिल्या लाटेनंतर या देशाने साथीवर नियंत्रण मिळविल्याचे दावे समोर आले होते.

मात्र गेल्या दोन महिन्यात परिस्थिती बदलली असून इटलीतील रुग्ण व बळींची संख्या वेगाने वाढते आहे. इटलीतील दक्षिणेकडील प्रांतांमध्ये रुग्णवाढीचे तसेच बळींचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामागे देशातील वृद्धांची वाढती संख्या, ढासळलेली आरोग्य व्यवस्था, अपुरी सज्जता व सामाजिक रचना हे घटक कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येते. इटलीत साथीचा फैलाव वाढत असल्याने येत्या काही दिवसात ‘लॉकडाऊन’सह नवे निर्बंध लागू करण्यात येतील, असे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान, ‘डब्ल्यूएचओ’ने युरोपिय देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याचा गंभीर इशारा दिला आहे. ‘काही मोजक्या भागातील प्रगती वगळता बहुतांश युरोपिय देशांमध्ये कोरोनाची व्याप्ती व तीव्रता वाढताना दिसत आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये कोरोनाचा धोका अधिक बळावू शकतो’, असा इशारा देण्यात आला आहे. या इशार्‍याच्या पार्श्‍वभूमीवर युरोपिय महासंघातील प्रमुख आरोग्य यंत्रणा ‘ईसीडीसी’ने यापुढे कोरोना साथीसंदर्भातील दैनंदिन आकडेवारी जाहीर न करता दर आठवड्याला माहिती प्रसिद्ध करण्याची घोषणा केली आहे.

leave a reply