लष्कराने चीनच्या आक्रमणाचा कमालीच्या साहसाने मुकाबला केला

- वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांचा दावा

नवी दिल्ली – ‘लडाखच्या एलएसीवर भारतीय लष्कराने ज्या धैर्याने चीनच्या आक्रमणाचा सामना केला, त्याला तोड नाही. गेल्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात भारतीय लष्कराने लडाखच्या एलएसीवर कारवाई करून महत्त्वाच्या टेकड्यांचा ताबा घेतला, ही फार मोठी कामगिरी ठरते. यामुळे चिनी लष्कराच्या विरोधात भारतीय सैन्याला सामरिक आघाडी मिळालेली आहे’, असे भारतीय लष्कराच्या नॉर्दन कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी म्हटले आहे. त्याचवेळी लष्कराच्या नॉर्दन कमांडला एकाच वेळी तीन आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे ले. जनरल जोशी म्हणाले.

गलावान खोर्‍यातील संघर्षानंतरही भारताच्या विरोधात कारवाया सुरू ठेवणार्‍या चिनी लष्कराला गेल्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात भारतीय लष्कराने चांगलाच दणका दिला होता. २९-३० ऑगस्ट २०२० च्या मध्यरात्री भारतीय सैनिकांनी पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडे असलेल्या मुखपरी, रेचिन ला आणि मगर टेकड्यांचा ताबा घेतला होता. या टेकड्यांवर भारतीय सैनिकांनी ठाण मांडले असून इथून चिनी जवानांच्या हालचाली टिपणे भारतीय सैनिकांसाठी अतिशय सोपे जात आहे. इतकेच नाही तर संघर्षाची स्थिती उद्भवल्यास, या क्षेत्रातील चीनचे जवान भारतीय सैनिकांच्या मार्‍याच्या टप्प्यात येतील. त्यामुळे चीन कमालीचा अस्वस्थ झाला असून भारतीय लष्कराने या टेकड्यांवरील तैनाती मागे घ्यावी, अशी मागणी चीन करीत आहे.

म्हणूनच ही भारतासाठी फार मोठी जमेची बाजू ठरते. यामुळे चीनशी वाटाघाटी करणे भारतासाठी सोपे जात असल्याचा दावा ले. जनरल वाय. के. जोशी यांनी केला आहे. या क्षेत्रात भारतीय सैन्यासमोर केवळ एकच नाही, तर तीन आव्हाने आहेत. दहशतवाद हेच राष्ट्रीय धोरण बनविणार्‍या पाकिस्तानच्या कारवायांपासून या क्षेत्राला धोका आहे. एलएसीवरील चीनची घुसखोरी ही मोठी समस्या आहेच. याच्या बरोबरीने अंतर्गत सुरक्षेचे आव्हानही भारतीय लष्कराच्या नॉर्दन कमांडसमोर आहे, याची जाणीव ले. जनरल जोशी यांनी करून दिली आहे.

leave a reply