कोरोनाच्या काळात भारताने निर्णायक पावले उचलली

- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची प्रशंसा

वॉशिंग्टन – कोरोनाची साथ व त्याचे आर्थिक परिणाम यांचा सामना करीत असताना भारताने निर्णायक पावले उचलली आहेत, अशी प्रशंसा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केली आहे. नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्तलिना जॉर्जिवा यांनी भारताची प्रशंसा करीत असताना, या आघाडीवर भारत इतर विकसनशील देशांच्या पुढे असल्याचे म्हटले आहे. २६ जानेवारी रोजी नाणेनिधीचा आर्थिक अहवाल प्रसिद्ध केला जाईल. यात भारताच्या या कामगिरीची नोंद केलेली असेल, असे जॉर्जिवा पुढे म्हणाल्या.

कोरोनाच्या साथीचा जगभरातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांवर विपरित परिणाम झालेला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेलाही याचा फार मोठा फटका बसला. त्यातच ही साथ झपाट्याने वाढण्याच्या आधी भारताने लॉकडाऊन घोषित केले होते. यामुळे अर्थव्यवहार ठप्प झाले आणि अर्थव्यवस्था मंदावली होती. पण पुढच्या काळात भारताने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन मागे घेतले. त्याचवेळी अर्थव्यवस्था गतीमान करण्यासाठी भारताने निर्णायक पावले उचलली, असे नाणेनिधीच्या प्रमुख म्हणाल्या.

पतधोरण व वित्तीय धोरण या दोन्ही आघाड्यांवर भारत सरकारने घेतलेल्या निर्णयांची जॉर्जिवा यांनी प्रशंसा केली. यामुळे भारताने इतर विकसित देशांपेक्षाही कोरोनाच्या साथीचा व यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्यांचा अधिक चांगल्यारितीने सामना केला. मात्र या आघाडीवर भारतासाठी अधिक चांगली करण्यासाठी वाव आहे व भारत ते नक्कीच करील, असा विश्‍वासही जॉर्जिवा यांनी व्यक्त केला आहे. मुख्य म्हणजे आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमावर भारत ठाम आहे, ही फार मोठी जमेची बाजू ठरते, असेही नाणेनिधीच्या प्रमुखांनी पुढे म्हटले आहे.

२६ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध केला जाईल. यात भारताने केलेल्या या कामगिरीचे प्रतिबिंब पडलेले असेल, असे संकेत जॉर्जिवा यांनी दिले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आंतररष्ट्रीय नाणेनिधीने पुढच्या आर्थिक वर्षासाठी भारताचा विकासदर ८.८ टक्के असेल, असे भाकीत वर्तविले होते.

leave a reply