जपानच्या सेंकाकूच्या हद्दीत चीनच्या जहाजांची घुसखोरी

नाहा – चीनच्या दोन गस्तीनौकांनी जपानच्या सेंकाकू द्वीपसमुहांच्या हद्दीत घुसखोरी केली आहे. यावेळी चिनी जहाजांनी जपानच्या मच्छिमार नौकांच्या दिशेने धोकादायक प्रवास केल्याचा आरोप जपानने केला. दरम्यान, जपानच्या सागरी क्षेत्रातील चिनी जहाजांची घुसखोरी कदापि सहन केली जाणार नाही, अशी टीका जपानचे कॅबिनेट सचिव कात्सुनोबू काटो यांनी केली.

साधारण दोन महिन्यांपूर्वी चीनने आपल्या तटरक्षक दलाच्या अधिकारांमध्ये वाढ केली आहे. ‘ईस्ट किंवा साऊथ चायना सी’च्या हद्दीत विनापरवाना प्रवेश करणार्‍या परदेशी जहाजांवर थेट गोळीबार करण्याचे स्वातंत्र्य चीनने आपल्या तटरक्षक दलांना दिले आहेत. यानंतर चीनच्या गस्तीनौकांच्या संबंधित सागरी क्षेत्रातील हालचाली वाढल्या आहेत. सोमवारी चीनच्या दोन गस्तीनौकांनी जपानच्या सेंकाकू द्वीपसमुहांच्या सागरी क्षेत्रात घुसखोरी केली.

यावेळी चिनी जहाजांनी या सागरी क्षेत्रात मासेमारी करणार्‍या जपानच्या जहाजांच्या दिशेने आक्रमक प्रवास केला. याआधी चीनच्या जहाजांनी साऊथ चायना सीच्या क्षेत्रात व्हिएतनाम व फिलिपाईन्सच्या मच्छिमार नौकांना धडक देऊन जलसमाधी दिली होती. या पार्श्‍वभूमीवर, चिनी जहाजांच्या या आक्रमक घुसखोरीवर जपानने चिंता व्यक्त केली आहे. तसेच जपानच्या सेंकाकू द्वीपसमुहाच्या क्षेत्रातील चीनच्या गस्तीनौकांची घुसखोरी खपवून घेणार नसल्याचे कॅबिनेट सचिव काटो यांनी म्हटले आहे. दरम्यान, जपानच्या सेंकाकूच्या हद्दीत चीनच्या जहाजांनी केलेली ही या वर्षातील ही ११ वी घुसखोरी ठरते.

leave a reply