बायडेन यांच्या कमकुवत नेतृत्त्वाचा अमेरिकेच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होईल

- संयुक्त राष्ट्रसंघातील माजी राजदूत निक्की हॅले यांचे टीकास्त्र

वॉशिंग्टन – ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना चीनवर टीका करणे आवश्यक असल्याचे वाटत नाही. चीन जगातील सर्वात सामर्थ्यशाली देश बनण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्याचवेळी हा देश उघडपणे उघुरांचा वंशसंहार घडवित आहे. बायडेन यांच्या या अशा कमकुवत नेतृत्त्वामुळे अमेरिकेच्या भविष्यावर विपरित परिणाम होईल’, अशी खरमरीत टीका संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी केली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही अलास्कामधील चीनबरोबरील बैठकीच्या मुद्यावरून बायडेन प्रशासनाला लक्ष्य केले आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेतली होती. साऊथ चायना सी, तैवान, उघुरवंशिय, तिबेट, ५जी, हेरगिरी यासारख्या अनेक मुद्यांवरून ट्रम्प प्रशासनाने चीनविरोधात कारवाईही केली होती. मात्र जानेवारी महिन्यात बायडेन यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर कारवाईची तीव्रता कमी झाल्याचे समोर येऊ लागले होते. रशियाविरोधात एकापाठोपाठ निर्बंध लादणार्‍या राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी चीनच्या मुद्यावर मात्र मवाळ धोरण स्वीकारले होते. उघुरवंशियांच्या मुद्यावर बायडेन यांनी चीनची बाजू उचलून धरणारी वादग्रस्त भूमिका घेतली होती.

काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत बायडेन यांनी चीनच्या मुद्यावर वक्तव्य केले होते. ‘जगाचे नेतृत्त्व करणारा सर्वाधिक श्रीमंत व सामर्थ्यशाली देश बनणे हे चीनचे उद्दिष्ट आहे. या हेतूवरून मी चीनवर टीका करणार नाही’, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले होते. बायडेन यांच्या या भूमिकेवरून रिपब्लिकन पक्षाने त्यांना सातत्याने लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून हॅले यांनी केलेली टीकाही त्याचाच भाग ठरते.

निक्की हॅले यांनी गेल्याच महिन्यात, उघुरांच्या वंशसंहारावर आक्रमक भूमिका मांडताना, अमेरिकेने २०२२ साली चीनमध्ये होणार्‍या हिवाळी ऑलिंपिकमध्ये अजिबात सहभागी होऊ नये, अशी मागणी केली होती. अमेरिकेच्या माजी राजदूत हॅले यांनी अमेरिकी वृत्तसंस्थेसाठी लिहिलेल्या एका लेखात हिटलर आणि चीनमधील जिनपिंग यांच्या राजवटीची तुलनाही केली होती.

निक्की हॅले यांच्यापाठोपाठ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही बायडेन प्रशासनाला चीनच्या मुद्यावरून धारेवर धरले आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिका व चीनमध्ये अलास्कामध्ये विशेष राजनैतिक बैठक पार पडली होती. या बैठकीत अमेरिका व चीनच्या नेत्यांमध्ये जबरदस्त शाब्दिक चकमक उडाल्याचे प्रसिद्ध झाले होते. यावेळी चीनच्या नेत्यांनी अमेरिकेचे नेतृत्त्व मान्य करणार नाही, असे खडसावून जोरदार टीकास्त्र सोडले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या पथकावर झालेली अशी टीका आपण खपवून घेतली नसती, असे ट्रम्प यांनी बजावले. अलास्कामधील बैठकीत चीनने अमेरिकेच्या नेत्यांना सुनावणे ही बायडेन प्रशासनासाठी मोठी मानहानीची घटना ठरते, याकडेही माजी राष्ट्राध्यक्षांनी लक्ष वेधले. आपण बायडेन यांच्या जागी असतो तर या मुद्यावरून चीनवर जबरदस्त निर्बंध लादले असते, असेही ट्रम्प यांनी सांगितले. त्याचवेळी आपल्या कारकिर्दीत चीनबरोबर झालेल्या बैठकांमध्ये अशा प्रकारची घटना कधीही घडली नव्हती, याची आठवणही माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी करून दिली.

leave a reply