तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले

काबुल – तालिबानसमोर शरणांगती पत्करून अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी राजीनामा दिला. यानंतर काबुलमध्ये गदारोळ माजला असून रशियाचा अपवाद वगळता सर्वच देशांनी आपले काबूलमधील दूतावास बंद करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना मायदेशी बोलावून घेतले. हवालदिल झालेले अफगाणी शक्य तितके पैसे काढून घेण्यासाठी एटीएमच्या बाहेर रांगा लावून उभे आहेत. काबुलमध्ये घुसणार नाही, असे आश्‍वासन देणाऱ्या तालिबानने आपला शब्द फिरविला असून तालिबानी दहशतवादी काबुलमध्ये शिरल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळे अफगाणिस्तानातील या अराजकाचे भीषण परिणाम साऱ्या जगाला सहन करावे लागतील, असे स्पष्ट संकेत आत्तापासूनच मिळत आहेत.

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतलेतालिबानचे दहशतवादी राजधानी काबुलपासून काही मिनिटांच्या अंतरावर ठाण मांडून बसलेले असताना, अश्रफ गनी यांनी राजीनामा दिला. त्याआधी अमेरिकेचे विशेषदूत झल्मे खलिलझाद यांनी नाटोच्या अधिकाऱ्यांसह अश्रफ गनी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आलेला हा राजीनामा म्हणजे अमेरिका व तालिबानमध्ये पार पडलेल्या वाटाघाटींचा भाग असल्याचे दिसत आहे. दोहा येथील चर्चेत सहभागी झालेला तालिबानचा नेता मुल्ला अब्दुल गनी बरादर यानेही अश्रफ गनी यांची भेट घेतली. यानंतर अफगाणी नेत्यांना तालिबानच्या वेढ्यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले जाते.

अश्रफ गनी व उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह आपल्या परिवारासह ताजिकिस्तानमध्ये गेल्याचे दावे केले जातात. तर अफगाणिस्तानच्या सरकारमधील इतर नेते पाकिस्तानच्या इस्लामाबाद विमानतळावर उतरल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. यानंतर तालिबानचे दहशतवादी काबुलमध्ये घुसले आणि काही ठिकाणी लूटमार सुरू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता जीव वाचविण्यासाठी कुठे जायचे, हा प्रश्‍न हवालदिल बनलेल्या अफगाणी जनतेला पडला आहे. अमेरिकेच्या दूतावासाने सोशल मीडियावरून काबुलमधील अमेरिकी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याची सूचना करण्यात आली आहे.तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले

काबुलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोळीबार झाल्याची माहिती अमेरिकी दूतावासाने दिली आहे. काबुलमधील आपल्या दूतावासाच्या कर्मचाऱ्यांना मायदेशी बोलावण्यासाठी सर्वच प्रमुख देशांनी आपली विमाने धाडली. त्यामुळे या विमानतळावरचा ताण वाढला होता. भारताने देखील आपल्या कर्मचारी व नागरिकांना मायदेशी आणले असून यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान काबुलमध्ये उतरले होते. आत्तापर्यंत 126 भारतीय नवी दिल्ली येतील विमानतळावर उतरले आहेत.

अफगाणिस्तानातून भारतीयांना मायदेशी आणण्याची आकस्मिक योजना तयार होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अफगाणिस्तानला सीमा भिडलेल्या सर्वच देशांनी आपली सीमा बंद करून टाकली आहे. पण पाकिस्तान मात्र तालिबानला मिळालेल्या यशावर जल्लोष करीत आहे.

leave a reply