स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पंतप्रधानांकडून आत्मनिर्भरतेचा संदेश

नवी दिल्ली – ‘कोरोनाच्या साथीमुळे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळापासून चालत आलेल्या जागतिक व्यवस्थेत फेरबदल होत आहेत. या साथीनंतर जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्याचवेळी भारतासमोर दहशतवाद व विस्तारवादाचे संकट खडे ठाकलेले आहे. या आव्हानांना देश हिंमतीने व कणखरपणे उत्तर देत आहे’, अशा शब्दात 75 व्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान व चीनपासून असलेल्या धोक्यांची जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दिली. त्याचवेळी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात संपूर्ण आत्मनिर्भरतेचे ध्येय पुढच्या 25 वर्षात गाठण्याचा संदेश पंतप्रधानांनी दिला. यासाठी विकासाचा आराखडा मांडून या आघाडीवर मिळालेल्या यशाचा पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पंतप्रधानांकडून आत्मनिर्भरतेचा संदेशस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करीत असताना, फाळणीमुळे मिळालेल्या वेदनांचा विसर पडता कामा नये. म्हणूनच पुढच्या काळात 14 ऑगस्ट हा ‘फाळणी भयावह स्मृतीदिन’ घोषित करण्यात आला आहे. फाळणीच्या काळात ज्यांना अमानुष परिस्थितीला सामोरे जावे लागले, अत्याचार सहन करावे लागले, कित्येकांना सन्मानाने अत्यंसंस्कारही मिळाले नाहीत, त्या सर्वांना भारतीयांकडून याद्वारे उचित श्रद्धांजली अर्पण करता येईल, असे भावपूर्ण उद्गार पंतप्रधानांनी काढले.

कोरोनाची लस विकसित करण्यात देशाला मिळालेल्या यशाचा पंतप्रधानांनी यावेळी गौरवपूर्ण उल्लेख केला. या संकटाच्या काळात देशातील डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी आणि लस विकसित करणारे संशोधक, या साऱ्यांची पंतप्रधानांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. ही साथ आलेली असताना, देशात 80 कोटी देशवासियांना अन्नधान्याचा पुरवठा केला जात होता, हा जगात चर्चेचा विषय बनला आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. त्याचवेळी कोरोनाच्या साथीनंतर जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टी बदललेली आहे, असे सांगून पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे महत्त्व वाढल्याची बाब अधोरेखित केली.

25 वर्षानंतर देश स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करील. त्याआधी 100 टक्के आत्मनिर्भरतेचे ध्येय गाठणे हे आपले स्वप्न असले पाहिजे. त्यासाठी ‘सबका प्रयास’ आवश्‍यक असल्याचे सांगून यासाठी एक क्षणही वाया दवडता कामा नये, असे पंतप्रधान म्हणाले. यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांची पंतप्रधानांनी माहिती दिली. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 100 लाख कोटी रुपयांच्या ‘गती शक्ती’ प्रकल्पामुळे कोट्यावधी देशवासियांची स्वप्ने पूर्ण होतील व लाखो तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील, असा विश्‍वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. पायाभूत सुविधांच्या बांधकामाबाबत व्यापक व एकात्मिक दृष्टीकोनाची गरज असल्याचे पंतप्रधान पुढे म्हणाले. “ऊर्जा क्षेत्रात देश अजूनही परावलंबी असून याच्या आयातीवर देशाला दरवर्षी 12 लाख कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. या आघाडीवर आत्मनिर्भतेचे स्वप्न साकार होणे आवश्‍यक आहे. पुढच्या काळात हरित हायड्रोजन हे जगाचे भवितव्य ठरेल. या क्षेत्रातील उद्दीष्ट साध्य करण्यासाठी मी तिरंग्याच्या साक्षीने राष्ट्रीय हायड्रोजन अभियानाची घोषणा करीत आहे. या हरित प्रगतीतून रोजगाराच्या नव्या संधी आपल्यासाठी निर्माण होतील. अमृतमहोत्सवी वर्षापासून सुरू झालेल्या या अमृतकाळात देशाला हरित हायड्रोजनच्या उत्पादन व निर्यातीचे जागतिक केंद्र बनायचे आहे”, हे ध्येय पंतप्रधानांनी देशवासियांसमोर ठेवले.

2030 सालापर्यंत देशाने 450 गिगावॅट इतक्या प्रमाणात अक्षय ऊर्जेची निर्मिती करण्याचे ध्येय समोर ठेवले होते. यापैकी 100 गिगावॅट ऊर्जेच्या निर्मितीचे ध्येय देशाने निश्‍चित मुदतीच्या आधीच साध्य केले, असे सांगून पंतप्रधानांनी यावर समाधान व्यक्त केले. ‘काही शतकांपासून तसेच काही दशकांपासून भेडसावणाऱ्या समस्या आजचा भारत सोडवित आहे. यामध्ये कलम 370 हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय असो किंवा देशाला करांच्या जंजाळातून सोडविण्याची व्यवस्था असो, आपल्या सैनिकांना एक श्रेणी-एक पेन्शनची व्यवस्था असो की रामजन्मभूमी विवाद शांततामय मार्गाने सोडविणारा तोडगा असो, या सगळ्या गोष्टी गेल्या काही वर्षात आपण प्रत्यक्षात उतरताना पाहत आहोत’, असे सांगून या आघाडीवर देशाला मिळालेल्या यशावर पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.

याबरोबरच देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या इतर योजनांची माहिती देऊन पंतप्रधानांनी प्रशासकीय अडसर दूर करून कारभार अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख करण्याचा सरकारचा निर्धार प्रखरपणे मांडला.

leave a reply