नवी दिल्ली – देशाला आता शंभर कोटी लसींचे भक्कम सुरक्षा कवच लाभलेले आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने कोरोनाच्या १०० कोटी लसींचा टप्पा ओलांडल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यासाठी काम करणार्या आरोग्य क्षेत्रातील प्रत्येकाचे पंतप्रधानांनी मनापासून अभिनंदन करून आभार मानले आहेत. अमेरिका, इस्रायल या देशांसह जागतिक आरोग्य संघटनेने व संयुक्त राष्ट्रसंघानेही यासाठी भारताची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
अवघ्या २७९ दिवसात भारताने कोरोनाच्या लसीकरणात १०० कोटींचा टप्पा गाठला. चीनने याहूनही अधिक लसी आपल्या जनतेला दिल्याचे दावे केले आहेत. पण चीनच्या लसींचा प्रभाव व विश्वासार्हता यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न उपस्थित केले जातात. त्यामुळेच चीनच्या या दाव्यांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेली नव्हती. मात्र भारताच्या या आघाडीवरील कामगिरीला आंतरराष्ट्रीय स्तरावरून दाद मिळत आहे.
१०० कोटींच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडून देशाने कोरोनाच्या साथीविरोधात भक्कम सुरक्षा कवच उभारल्याचे सांगून पंतप्रधानांनी हे १३० कोटी भारतीयाचे सामूहिक यश ठरते, असे भावपूर्ण उद्गार काढले. देशाचे संशोधक व उद्योगक्षेत्र आणि सामाजिक संघटनांनी देशाचे आरोग्यक्षेत्र मजबूत करण्यासाठी फार मोठे योगदान दिलेे आहे, याचाही कृतज्ञतापूर्ण उल्लेख यावेळी पंतप्रधानांनी केला.
प्रगत आरोग्य यंत्रणा असलेल्या विकसित देशांनाही लसीकरणाच्या आघाडीवर इतके यश मिळालेले नाही. त्यामुळे या कामगिरीद्वारे भारताने सार्या जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडले होते. काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी भारताने लसीकरणाच्या आघाडीवर समोर ठेवलेले लक्ष्य अवास्तव असल्याची शेरेबाजी केली होती. भारताने समोर ठेवलेले लक्ष्य व या देशातील आरोग्यविषयक सुविधा यांच्यात ताळमेळ नसल्याचा दावा या माध्यमांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर, भारताचे हे यश अधिकच ठळकपणे समोर येत आहे.