अकराव्या दिवशीही पुंछमधील ऑपरेशन सुरूच

- श्रीनगरमध्येही चकमक बारामुल्लामधून आयईडी जप्त

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये भिंबार गलीच्या जंगलक्षेत्रात सुरू असलेले दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशनचा गुरुवारी अकरावा दिवस होता. लष्कराचे जवान जंगलात शिरून दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. दहशतवाद्यांकडून होणारा गोळीबार थांबला असल्याच्याही बातम्या येत आहेत. दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या इतर भागातही दहशतवाद्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी श्रीनगरच्या छानपोरा भागातही दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू झाली आहे. येथे दोन ते तीन दहशतवादी अडकल्याचे दावे करण्यात येत आहेत. याशिवाय बारामुल्लात गुरुवारी महामार्गावर दहशतवाद्यांनी घातपात घडविण्याच्या उद्देशाने लपविण्यात आलेला शक्तीशाली आयईडी सुरक्षादलांनी ताब्यात घेऊन निकामी केला. यामुळे मोठा घातपाट टळला आहे.

अकराव्या दिवशीही पुंछमधील ऑपरेशन सुरूच - श्रीनगरमध्येही चकमकगेल्या काही दिवसात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेले टार्गेट किलिंग आणि हिवाळ्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी सीमेवर सुरू असलेल्या दहशतवाद्यांच्या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर ऑपरेशन ऑल आऊट अधिक व्यापक केले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये एकाच वेळी निरनिराळ्या ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. यामध्ये पुंछमधील भिंबर गली या पीर पंजालच्या जंगलाचा भाग असलेल्या जंगलक्षेत्रात गेल्या १८ वर्षातील सर्वात मोठे ऑपरेशन सुरू आहे. १८ वर्षांपूर्वी हिलकाक भागातील जंगलात फार मोठे ऑपरेशन सुरक्षादलांना हाती घ्यावे लागले होते. २००३ साली या भागात दहशतवाद्यांनी घुसखोरी करून येथेच आपले प्रशिक्षण तळ उभारले होते. ५०० जणांना पुरेल इतक्या रेशनसाठ्याबरोबर प्रचंड मोठा शस्त्र व स्फोटकसाठा जमा करण्यात आला होता. तसेच बंकरही बांधले होते. ही घुसखोरी कारगिल युद्धानंतरच सुरू झाली होती. त्यामुळे हे घनदाट जंगल दहशतवाद्यांपासून मुक्त करण्यासाठी पीर पंजालच्या पर्वतीय क्षेत्रात एकाचवेळी दीडशे चौरस किलोमीटर क्षेत्रात कारवाई सुरू करण्यात आली होती. या ऑपरेशनमध्ये ६२ दहशतवादी ठार झाले होते. तर दोन जवानांना वीरमरण आले होते.

पुंछमध्ये सध्या सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये आतापर्यंत ९ जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांकडून गोळीबार थांबला आहे. सुरक्षादलाचे जवान जंगलात आतपर्यंत घुसले असून दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत पीर पंजालच्या या जंगलाचा भाग पुंछमधील भिंबार गलीपासून सुरू होतो, तो शोपियानपर्यंत पसरलेला आहे. राजौरी आणि पुंछ या दोन्ही जिल्ह्यांमध्ये हे जंगल विभागलेले असून हिवाळ्यात येथे प्रचंड बर्फवृष्टी होते. त्यापूर्वी दहशतवाद्यांना घुसखोरी करुन येथून काश्मीर खोर्‍यात शिरकाव करायचा असल्याचे दावे करण्यात येत आहेत.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौर्‍यावर पोहोचणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता माजविण्यासाठी दहशतवाद्यांनी बदललेली कार्यपद्धती व सीमेवरील घुसखोरीच्या प्रयत्नांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीयमंत्र्यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरतो. वरीष्ठ अधिकार्‍यांबरोबर बैठक घेऊन केंद्रीय गृहमंत्री येथील परिस्थिती व पुढील कारवाईचा आढावा घेतील. तीनच दिवसांपूर्वी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनीही जम्मू-काश्मीरचा दौरा केला होता.

leave a reply