तालिबान नाटो व मित्रदेशांना उत्तरदायी आहे

- नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग

उत्तरदायीब्रुसेल्स – ‘दोन दशके चाललेली अफगाणिस्तानातील नाटोच्या लष्करी मोहिमेतून बरेच काही शिकण्यासारखे आहे. ज्याप्रकारे नाटोच्या इतिहासातील सर्वात मोठी लष्करी मोहीम संपुष्टात आली, ते पाहता अफगाणिस्तानातील आव्हानांना कमी लेखता येणार नाही’, असे नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी कारवाई, मानवाधिकार या मुद्यांवर तालिबान नाटो व सहकारी देशांना उत्तरदायी आहे, असा इशारा स्टोल्टनबर्ग यांनी दिला.

नाटोचे अध्यक्ष जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी नाटोच्या सदस्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांना ब्रुसेल्स येथील मुख्यालयात बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटनांपासून असलेला धोका, यावर सदर बैठकीत चर्चा होणार आहे. त्याआधी माध्यमांशी बोलताना नाटोच्या प्रमुखांनी अफगाणिस्तानातील मोहिमेतून बरेच काही शिकण्यासारखे होते, असे सांगितले.

नाटो अफगाणिस्तानातील आपल्या मुख्य उद्दिष्टातून भरकटल्याचा दावा स्टोल्टनबर्ग यांनी केला. ‘नाटोने अल कायदाला संपविण्यासाठी अफगाणिस्तानात मर्यादित, छोटी लष्करी मोहीम, दहशतवादविरोधी संघर्ष छेडले होते. हे नाटोचे अफगाण मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट होते. पण कालांतराने अफगाणिस्तानची पुननिर्मिती करण्याच्या युरोपिय महासंघ आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यातही नाटो सहभागी झाली’, असे स्टोल्टनबर्ग पुढे म्हणाले. त्याचबरोबर अफगाणिस्तानची फेरउभारणी हे काही नाटोचे काम नव्हते, अशा शब्दात नाटोच्या प्रमुखांनी यासाठी अप्रत्यक्षरित्या अमेरिकेला दोषी ठरविले.

उत्तरदायीनाटो सदस्य देशांच्या सीमेपलिकडील आणि एवढ्या प्रदिर्घ लष्करी मोहिमेत सहभागी होताना कोणती आव्हाने व धोके असतात, हे अफगाणिस्तानातील २० वर्षांच्या संघर्षामुळे समोर आले. याचा अर्थ, यापुढे अशा दहशतवाद किंवा कट्टरवादविरोधी मोहिमांमध्ये नाटो सहभागी होणार नाही, असा होत नाही’, असे सांगून यापुढेही अशा कारवाया होत राहतील, असे संकेत स्टोल्टनबर्ग यांनी दिले.

आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांना अफगाणिस्तानात आश्रय मिळणार नाही, मानवाधिकारांचे पालन होईल आणि अफगाणिस्तानातून बाहेर पडणार्‍यांना सुरक्षित मार्ग दिला जाईल, असे तालिबानने नाटो व सहकारी देशांसमोर मान्य केले होते. त्याची अंमलबजावणी करणे, ही तालिबानची जबाबदारी ठरते, असे स्टोल्टनबर्ग यांनी बजावल्याचे अफगाणी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

शुक्रवारी नाटो सदस्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन गुरुवारीच ब्रुसेल्समध्ये दाखल झाले असून त्यांनी स्टोल्टनबर्ग यांची भेट घेतली. रशियानेही तालिबानबरोबर बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये भारत, चीन, पाकिस्तान, तुर्की तसेच अफगाणिस्तानच्या शेजारी देशांचा समावेश होता. अमेरिकेने या बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यानंतर नाटोने ही बैठक आयोजित केली आहे. नाटोने ही बैठक आयोजित करण्याबाबत दाखविलेली लगबग बरेच काही सांगून जाणारी आहे. अफगाणिस्तानच्या प्रश्‍नात रशियाला हस्तक्षेप करण्याची व याद्वारे आपला प्रभाव वाढविण्याची संधी दिली जाणार नाही, असा संदेश नाटोने दिलेला आहे. नाटोच्या प्रमुखांनी तालिबानला दिलेला इशाराही ही बाब अधोरेखित करीत आहे.

leave a reply