‘सीओपी२६ समिट’च्या पार्श्‍वभूमीवर भारत व ब्रिटनच्या पंतप्रधानांची द्विपक्षीय चर्चा

‘सीओपी२६ समिट’ग्लास्गो – ब्रिटनच्या ग्लास्गो शहरात सोमवारी सुरू झालेल्या ‘सीओपी२६ समिट’च्या पार्श्‍वभूमीवर भारत व ब्रिटनच्या पंतप्रधानांमध्ये द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा झाली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली असून ग्रीन हायड्रोजन, क्लीन टेक्नॉलॉजी यासह अर्थव्यवस्था तसेच संरक्षणसहकार्यावर बोलणी झाल्याचे स्पष्ट केले. गेल्या वर्षी ब्रिटनच्या पंतप्रधानांचा भारत दौरा दोनदा पुढे ढकलण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही देशांच्या नेत्यांची प्रत्यक्षात झालेली भेट महत्त्वाची ठरते.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी उशिरा ब्रिटनच्या ग्लास्गोमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधला. सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या ‘सीओपी२६ समिट’ला सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची स्वतंत्र भेट घेतली. कोरोनाच्या साथीमुळे ब्रिटनच्या पंतप्रधानांची भारतभेट दोन वेळा रद्द करावी लागली होती. त्यानंतर दोन नेत्यांमध्ये व्हर्च्युअल परिषद पार पडली होती. मात्र प्रत्यक्षात भेट होण्याची गेल्या दोन वर्षातील ही पहिलीच वेळ ठरते.

दोन नेत्यांमध्ये झालेल्या व्हर्च्युअल परिषदेत, २०३० सालापर्यंत दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक भागीदारी विकसित करण्यासाठीचा नियोजनबद्ध आराखड्याची घोषणा झाली होती. सोमवारी झालेल्या चर्चेतही ‘रोडमॅप २०३०’चा मुद्दा अग्रस्थानी होता. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, ‘सीओपी२६ समिट’च्या आयोजनाबद्दल ब्रिटनचे अभिनंदन केले. त्यानंतर दोन नेत्यांमध्ये ग्रीन हायड्रोजन, क्लीन टेक्नॉलॉजी, रिन्युएबल्स या पर्यावरणाशी निगडीत मुद्यांवर बोलणी झाली. भारत व ब्रिटनमधील आर्थिक व संरक्षण क्षेत्रातील सहकार्य, व्यापार, दहशतवाद या मुद्यांवरही चर्चा झाल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

‘सीओपी२६ समिट’मध्ये भारत व ब्रिटन ‘ग्रीन ग्रिड्स इनिशिएटिव्ह’ची घोषणा करणार असल्याचे सांगण्यात येते. हा उपक्रम भारताने पुढाकार घेतलेल्या ‘इंटरनॅशनल सोलर अलायन्स’मधील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. दरम्यान, ब्रेझिक्टवरून युरोपिय महासंघ व ब्रिटनमध्ये सुरू असेलल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर, ब्रिटन भारताकडे आपला व्यापारी भागीदार देश म्हणून पाहत आहे. म्हणूनच गेल्या वर्षाच्या प्रजासत्ताकदिनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारतात प्रमुख पाहुणे म्हणून दाखल होणार होते. पण ब्रिटनमध्ये धडकलेल्या कोरोनाच्या लाटेमुळे हा दौरा रद्द करावा लागला.

पुढच्या काळातही पंतप्रधान जॉन्सन यांची भारतभेट रद्द करावी लागली. पण आता दोन्ही देशांच्या सहकार्याने अपेक्षित वेग पकडल्याचे संकेत पंतप्रधान मोदी यांच्या या ब्रिटन दौर्‍यातून मिळत आहेत.

leave a reply