भारत व ब्रिटन ‘ग्रीन ग्रिड्स इनिशिएटिव्ह’ची घोषणा करणार

ग्लास्गो – ब्रिटनमध्ये होणार्‍या संयुक्त राष्ट्रांच्या ‘सीओपी२६ समिट’च्या पार्श्‍वभूमीवर भारत व ब्रिटन ‘ग्रीन ग्रिड्स इनिशिएटिव्ह’ची घोषणा करणार आहेत. ही योजना भारताने पुढाकार घेतलेल्या ‘इंटरनॅशनल सोलर अलायन्स’मधील महत्त्वाचा टप्पा असेल, असे सांगण्यात येते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ब्रिटनमध्ये दाखल होत असून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबरोबरील बैठकीत, ‘ग्रीन ग्रिड्स इनिशिएटिव्ह’ जाहीर करण्यात येईल, अशी माहिती ब्रिटनने दिली. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या ब्रिटीश पंतप्रधानांबरोबरील बैठकीत ‘रोडमॅप २०३०’सह सागरी सुरक्षा, अंतराळक्षेत्रातील सहकार्य यासारख्या मुद्यांवर चर्चा होईल, अशी माहिती भारताच्या ब्रिटनमधील उच्चायुक्त गायत्री कुमार यांनी दिली.

भारत व ब्रिटन ‘ग्रीन ग्रिड्स इनिशिएटिव्ह’ची घोषणा करणारयुरोपिय महासंघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनने भारताबरोबरील आपले व्यापारी संबंध अधिकच दृढ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर गेल्या वर्षभरात कोरोनाच्या साथीसह इतर अनेक मुद्यांवर भारत व ब्रिटनमधील परस्पर सहकार्य वाढत असल्याचे समोर येत आहे. यावर्षी मे महिन्यात भारत व ब्रिटनच्या पंतप्रधानांची व्हर्च्युअल परिषद पार पडली होती. त्यानंतर ब्रिटनने वरिष्ठ मंत्री तसेच अधिकार्‍यांनी भारताला भेटही दिली होती. या भेटींमध्ये दोन देशांमधील सहकार्य अधिकाधिक दृढ व व्यापक करण्यासाठी पुढे पावले उचलण्यास सुरुवात झाली होती.

ग्लास्गोमधील ‘सीओपी२६ समिट’च्या पार्श्‍वभूमीवर घोषित होणारा ‘ग्रीन ग्रिड्स इनिशिएटिव्ह’ही त्याचाच भाग मानला जातो. ऑगस्ट महिन्यात ‘सीओपी२६ समिट’ची जबाबदारी सांभाळणारे ब्रिटनचे मंत्री आलोक शर्मा यांनी भारताला भेट दिली होती. या भेटीत ‘ग्रीन एनर्जी’साठी स्वतंत्र जागतिक बँक स्थापन करण्याच्या प्रस्तावासह दोन्ही देशांमध्ये ऊर्जा सहकार्यावर विस्तृत चर्चा झाली होती. या पार्श्‍वभूमीवर, ‘ग्रीन ग्रिड्स इनिशिएटिव्ह’ची घोषणा महत्त्वाची घटना ठरते.

हा उपक्रम भारताने पुढाकार घेतलेल्या ‘इंटरनॅशनल सोलर अलायन्स’चा भाग आहे. भारत व ब्रिटन ‘वन सन, वन वर्ल्ड वन ग्रीड’ या उपक्रमाच्या अंतर्गत दोन्ही देश आपले प्रकल्प एकाच मध्यवर्ती छत्राखाली आणणार आहेत. ‘इंटरनॅशनल सोलर अलायन्स’ ही भारताने पुढाकार घेऊन स्थापन केलेली आंतरराष्ट्रीय संघटना आहे. विकसित देशही या संघटनेचे सदस्य बनले असून नुकतेच संयुक्त राष्ट्रसंघालाही या संघटनेचे निरिक्षक म्हणून स्थान देण्यात आले आहे. ग्लोबल सोलर अलायन्समध्ये एकूण ९८ देशांनी सहभाग घेतला असून ही बाब भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढलेले महत्त्व सिद्ध करणारी ठरते. ब्रिटननेही संघटनेच्या अंतर्गत भारताशी सहकार्य करण्यासाठी उत्सुकता दाखविी असून त्यामुळे ही संघटना अधिकच मजबूत बनणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

भारत व ब्रिटनची भागीदारी योग्य दिशेने आणि गतीने पुढे चालली असून ही नव्या पर्वाची सुरूवात ठरू शकते, असे ब्रिटनमधील भारताच्या उच्चायुक्त गायत्री कुमार यांनी म्हटले आहे.

leave a reply