रियाध/दुबई/बैरूत – लेबेनॉन आणि आखाती देशांमधील राजनैतिक संबंध ताणले गेले आहेत. ‘इराणसमर्थक हिजबुल्लाहच्या वर्चस्वामुळे लेबेनॉनबरोबर संबंध ठेवणे निरर्थक बनले आहेत’, अशी टीका सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल बिन फरहान अल सौद यांनी केली. तर सौदी व बाहरिन पाठोपाठ युएई आणि कुवैतने देखील लेबेनॉनच्या राजदूतांची हकालपट्टी करून आपल्या नागरिकांना ताबडतोब लेबेनॉन सोडण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, येमेनमध्ये हौथी बंडखोरांकडून मिळत असलेल्या पराभवासाठी सौदी लेबेनॉनवर सूड उगवत असल्याचा आरोप लेबेनॉनमधील हिजबुल्लाहच्या नेत्याने केला.
गेल्या वर्षभरापासून भीषण आर्थिक संकटाला तोंड देत असलेला लेबेनॉन आंतरराष्ट्रीय समुदायाकडून अर्थसहाय्याची मागणी करीत आहे. युरोपिय तसेच आखाती देश लेबेनॉनला आर्थिक सहाय्य पुरवित होते. पण लेबेनॉनचे माहिती मंत्री जॉर्ज कुर्दोही यांनी येमेनमधील गृहयुद्धाबाबत केलेल्या विधानामुळे लेबेनॉनसमोरील आर्थिक तसेच राजकीय संकट अधिकच तीव्र बनले आहे. येमेनमधील हौथी बंडखोर परकीयांच्या आक्रमणापासून आत्मरक्षण करीत असल्याचे सांगून सौदी व अरब मित्रदेशांवर कुर्दोही यांनी अप्रत्यक्ष टीका केली होती.
यानंतर आखाती देशांच्या ‘गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल’ने (जीसीसी) लेबेनॉनवर टीका केली होती. तर सौदी अरेबिया व बाहरिन या अरब देशांनी लेबेनॉनमधील आपल्या राजदूतांना माघारी बोलावले होते. सौदीने तर लेबेनॉनमधील आयात देखील रोखली आहे. याला काही तास उलटत नाही तोच युएई आणि कुवैत या अरब मित्रदेशांनी देखील लेबेनॉनच्या राजदूतांची हकालपट्टी केली. लेबेनॉनच्या मंत्र्याचे विधान वादग्रस्त असून राजनैतिक संबंधांच्या मर्यादा ओलांडणारे असल्याचा ठपका युएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठेवला.
या प्रकरणावर स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सौदीचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल यांनी लेबेनॉनमधील इराणसंलग्न हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेला लक्ष्य केले. ‘सौदी आणि लेबेनॉनमधील संबंध बिघडल्यामुळे लेबेनॉनवर संकट कोसळलेले नाही. तर इराणसमर्थक हिजबुल्लाहमुळे लेबेनॉनमध्येच संकट निर्माण झाले आहे व हीच चिंता सौदीला सतावित आहे. त्यामुळे हिजबुल्लाहचे वर्चस्व असलेल्या लेबेनॉनमधील सरकारबरोबर कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवणे सौदी किंवा इतर आखाती देशांसाठी निरर्थक ठरते’, असा घणाघात प्रिन्स फैझल यांनी केला.
त्याचबरोबर अरब देशांबरोबर संबंध टिकवून लेबेनॉनला आपले गतवैभव प्राप्त करायचे असेल तर लेबेनॉनमधील नेत्यांना जागृत व्हावे लागेल, असा टोला प्रिन्स फैझल यांनी लगावला. येमेनमधील संघर्षाबाबत बोलताना सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणसमर्थक हौथी बंडखोरांवरही टीका केली. येमेनमधील सर्व गटांबरोबर राजनैतिक चर्चा करण्यासाठी सौदी तयार असून त्यासाठी पावलेही उचलली आहेत. पण हौथी बंडखोरांना हिंसाचाराशिवाय काहीच सुचत नसल्याचा आरोप परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल यांनी केला.
लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष मिशेल एऑन यांनी सौदीबरोबर लेबेनॉनला उत्तम पातळीवरील सहकार्य अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. मात्र सौदीच्या विरोधात वादग्रस्त विधाने करणार्या आपल्या माहिती मंत्री कुर्दोही यांचा राजीनामा घेण्यास राष्ट्राध्यक्ष मिशेल यांनी नकार दिला. लेबेनॉनमधील विरोधी पक्षनेते व जनता देखील कुर्दोही यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत. हिजबुल्लाहसमर्थक कुर्दोही यांच्यामुळे लेबेनॉनचे अरब देशांबरोबरील संबंध बिघडल्याचा आरोप लेबेनॉनमधून होत आहे. पण कुर्दोही यांनी आपल्या वक्तव्यातून माघार घेण्यास तसेच राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला.
त्यातच हिजबुल्लाहचे संसद सदस्य मोहम्मद राद यांनी येमेनमधील संघर्षावरुन सौदीवर नवा आरोप केला. येमेनमधील गृहयुद्धात हौथी बंडखोरांसमोर पराभूत झाल्यामुळे निराश झालेला सौदी लेबेनॉनवर सूड उगवित असून लेबेनॉनवरील संकटासाठी सौदीच जबाबदार असल्याचा ठपका राद यांनी ठेवला. यामुळे लेबेनॉन व सौदीमधील संबंधातील तणाव अधिकच वाढल्याचा दावा केला जातो.