दुबई – आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातनाम असलेली युएईची ‘एमिरेट्स’ प्रवासी विमान कंपनी लवकरच इस्रायलच्या तेल अविवसाठी विमानसेवा सुरू करणार आहे. ६ डिसेंबरपासून दररोज दुबई ते तेल अविव अशी विमानसेवा सुरू होईल, असे एमिरेट्सने जाहीर केले. काही आठवड्यांपूर्वीच युएईच्या एतिहाद या कंपनीने अबू धाबी ते तेल अविव अशी विमानसेवा याआधीच सुरू केलेली आहे. इस्रायल व युएईतील ही विमानसेवा म्हणजे वर्षभरापूर्वी प्रस्थापित झालेल्या दोन्ही देशांच्या सहकार्यातील महत्त्वाचा टप्पा ठरतो.
जगातील आघाडीच्या प्रवासी विमानसेवा पुरविणार्या कंपन्यांमध्ये एमिरेट्सचा उल्लेख केला जातो. युएईची फ्लॅग कॅरिअर अर्थात प्रमुख वाहक असलेली एमिरेट्स सर्वात व्यस्त विमान कंपन्यांपैकी एक मानली जाते. जगभरातील बहुतांश देशांबरोबर जोडलेल्या प्रवासी विमान कंपनीची सेवा इस्रायलमध्ये आत्तापर्यंत उपलब्ध नव्हती. पण एमिरेट्सने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, दुबई ते तेल अविव विमानसेवा इस्रायलला जगभरातील एमिरेट्सच्या सेवेशी अखंडपणे जोडेल.
६ डिसेंबर रोजी दुपारपासून सुरू होणारी ही विमानसेवा सुरू होईल. दुबईतून उड्डाण करणारे एमिरेट्सचे विमान तेल अविवचा प्रवास करून मध्यरात्री आधी दुबईत पोहोचेल. ही सेवा दररोज पुरविली जाईल. यामुळे ज्यूधर्मिय वास्तव करून असलेल्या अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतील सुमारे ३० गंतव्य स्थानांशी इस्रायली प्रवासी थेट जोडले जातील, असे एमिरेट्सने आपल्या घोषणेत म्हटले आहे.
त्याचबरोबर प्रवासी विमानसेवेबरोबर एमिरेट्स ‘स्काय कार्गो’ अर्थात मालवाहू विमानांची सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे इस्रायलमधील औषधोत्पादन, उच्च दर्जाची उत्पादने, भाज्या आणि इतर नाशिवंत गोष्टी तेल अविवमधून निर्यात केल्या जातील, असा दावा एमिरेट्स कंपनीने केला. युएईतील आघाडीच्या विमान कंपनीची ही मोठी घोषणा ठरते. इस्रायलबरोबर विमानसेवा सुरू करणारी ही युएईतील तिसरी कंपनी ठरते.
गेल्या वर्षी इस्रायल आणि युएईमध्ये पार पडलेल्या अब्राहम करारानंतर अवघ्या काही महिन्यातच ‘फ्लाय दुबई’ ही कमी खर्चात विमानसेवा पुरविणार्या कंपनीने अबू धाबी ते तेल अविव सेवा सुरू केली होती. तर काही महिन्यांपूर्वी युएईतील दुसर्या क्रमांकाच्या एतिहाद या कंपनीने विमानसेवा सुरू केली होती. यामुळे उभय देशांमधील सहकार्य वाढत असून याचा फायदा उभय देशांमधील व्यापाराला होत असल्याचा दावा केला जातो.
इस्रायलच्या ‘अरकिया’ या कंपनीने देखील युुएईसाठी दररोज विमानसेवा सुरू केली होती. तर गेल्या महिन्याच्या अखेरीस सौदी अरेबियाचे खाजगी विमान इस्रायलमध्ये उतरल्याची बातमी आली होती. अब्राहम करारामुळे इस्रायल व आखाती देश जवळ येत असल्याचे सांगून इस्रायली नेते त्यावर समाधान व्यक्त करीत आहेत.