चीनकडून जैविक खत खरेदी करण्यास नकार देणार्‍या श्रीलंकेला भारताचा जलदगतीने खताचा पुरवठा

- वायुसेनेची विमाने १०० टन खत घेऊन श्रीलंकेत दाखल

जैविक खतनवी दिल्ली/कोलंबो – चीनकडून खरेदी करण्यात आलेल्या जैविक खतांमध्ये हानीकारक सूक्ष्मजंतू आढळल्यावर श्रीलंकेने हे खत चीनला परत केले होते. यानंतर भडकलेल्या चीनने श्रीलंकेच्या सरकारी बँकेला ब्लॅकलिस्ट केले. मात्र या वादात श्रीलंकेमध्ये प्रचंड खताचा तुटवडा भासू लागला असून अशावेळी श्रीलंकेने भारताकडे तत्काळ खतांचा पुरवठा करावा, अशी मागणी केली होती. या पार्श्‍वभूमीवर भारतीय वायुसेनेच्या सहाय्याने श्रीलंकेला वेगाने खतांचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. १०० टन नॅनो नायट्रोजन लिक्विड युरिया घेऊन भारतीय वायुसेनेची अवजड विमाने गुरुवारी श्रीलंकेत दाखल झाली.

भारताने श्रीलंकेला सुरू केलेला खतांचा पुरवठा भारताचा श्रीलंकेवरील प्रभाव वाढविण्यास महत्त्वाचा सिद्ध होईल, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. तर श्रीलंकेच्या गेल्या काही निर्णयावरून चीन आणि श्रीलंकेमध्ये दरी निर्माण झाली असून ती रुंदावत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. गेल्याच महिन्यात श्रीलंकेमध्ये चीनने उभारलेल्या कोलंबो येथील बंदराशेजारी स्वतंत्र व त्याहून मोठे बंदर उभारण्याचे कंत्राट भारतीय कंपनीला मिळाले होते. तसेच यानंतर परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचा महत्त्वाचा श्रीलंकन दौराही पार पडला होता. यामध्ये संरक्षणासह विविध पातळ्यांवरील सहकार्य वाढविण्याचा निर्णय झाला होता.

श्रीलंकेत सध्या मोठ्या प्रमाणावर खतांची चणचण भासत आहे. श्रीलंकेत सध्या पेरणीचा हंगाम असून खते वेळेत मिळाली नाहीत, तर हा हंगाम वाया जाईल, या चिंतेने श्रीलंकन शेतकर्‍यांना ग्रासले आहे. त्यामुळे खतांच्या पुरवठ्याबाबत श्रीलंकेत शेतकर्‍यांकडून निदर्शनेही होत आहेत. श्रीलंकेने मे महिन्यातच रासायनिक खतांच्या वापरावर बंदी टाकली आहे. त्यामुळे श्रीलंकेने मोठ्या प्रमाणावर चीनमधील जैविक खते खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोलंबो बंदरात उतरलेल्या या खतांची तपासणी केल्यावर त्यामध्ये अत्यंत हानीकारक असे सूक्ष्मजंतू आढळून आले. यानंतर श्रीलंकेने चीनची सुमारे ९६ हजार टन खत स्वीकारण्यास नकार देऊन परत पाठविले. तर श्रीलंकेच्या न्यायालयाने या खताचे पैसेही चीनला चुकते करण्यासाठी श्रीलंकेच्या सरकारी बँकेला रोखले. या निर्णयामुळे चिनी कंपनीला मोठे नुकसान झाले असून यामुळे जैविक खतचीन भडकला आहे. यानंतर खताच्या खरेदीसाठी लेटर ऑफ क्रेडीट देणार्‍या श्रीलंकेच्या मुख्य सरकारी बँकेला चीनने ब्लॅक लिस्ट केले.

पण या सर्व वादात श्रीलंकेसमोर मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आणि श्रीलंकेला आपल्या शेजारी असलेल्या भारताची आठवण झाली. चीनची खते नाकारल्यावर श्रीलंकेने भारताकडून खत खरेदी करण्याची तयारी सुरू केली. मात्र या खतांचा पुरवठा भारताने वेगाने करावा, असे आवाहन श्रीलंकेने केले होते. जलमार्गाने श्रीलंकेपर्यंत खत पोहोचण्यात विलंब लागू शकतो, हे लक्षात घेऊन वायुसेनेच्या विमानांच्या सहाय्याने भारताने श्रीलंकेला खताचा पुरवठा सुरू केला आहे. वायुसेनेची दोन विमाने १०० टन लिक्वड नायट्रोजन खत घेऊन श्रीलंकेत दाखल झाली.

‘‘प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीत भारतीय वायुसेना पुन्हा एकदा श्रीलंकेसाठी आशेचा किरण घेऊन आली आहे. श्रीलंकेच्या सरकारने तत्काळ भारताकडे मागितलेल्या मदतीनंतर भारतीय वायुसेनेची विमाने १०० टन खते घेऊन श्रीलंकेत पोहोचली आहेत’’, असे भारताच्या श्रीलंकेतील उच्चायुक्ताने सोशल मीडियावर अधोरेखित केले.

leave a reply