युक्रेनच्या सीमेजवळ रशियाचे ९० हजार जवान तैनात

- युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाचा आरोप

किव्ह/वॉशिंग्टन – युक्रेनवरील लष्करी दडपण वाढविण्यासाठी आणि या क्षेत्रात तणाव निर्माण करण्यासाठी रशियाने युक्रेनच्या सीमेजवळ ९० हजार जवान तैनात केल्याचा आरोप युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केला. फक्त भूसीमाच नाही तर ब्लॅक सीच्या क्षेत्रातही रशियन युद्धनौकांच्या हालचाली वाढल्याचा दावा युक्रेन करीत आहे. युक्रेनला नाटोत सहभागी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अमेरिकेने मात्र यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने सैन्यतैनातीची काय आवश्यकता असेल, यावर अमेरिका विचार करीत आहे, असे अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी म्हटले आहे.

युक्रेनच्या सीमेजवळ रशियाचे ९० हजार जवान तैनात - युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाचा आरोपगेल्या आठवड्यातच अमेरिकेतील विश्‍लेषकांनी युक्रेनच्या सीमेजवळ रशिया नव्याने सैन्यतैनाती करीत असल्याचा दावा केला होता. सॅटेलाईट फोटोग्राफ्सचा हवाला देऊन रशियाच्या या तैनातीवर चिंता व्यक्त केली होती. कोणत्याही लष्करी सरावाची माहिती देण्यात आली नसताना युक्रेनच्या सीमेजवळ मोठ्या प्रमाणावर झालेली रशियाची सैन्यतैनाती चिंतेचे कारण ठरते, याकडे अमेरिकी विश्‍लेषकांनी लक्ष वेधले होते. बेलारूसबरोबरील सरावानंतर रशियाने टप्प्याटप्प्याने ही सैन्यतैनाती वाढविल्याचा दावा केला जातो.

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने अमेरिकी विश्‍लेषकांचा हा दावा सुरुवातीला फेटाळला होता. पण दोन दिवसानंतर युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, सीमेपासून सुमारे २६० किलोमीटर अंतरावर रशियन लष्कराची मोठी तुकडी तैनात आहे. यामध्ये रणगाडे, लष्करी वाहनांचा मोठा ताफा असल्याचाही दावा केला जातो. सीमेजवळील रशियाची ही तैनाती म्हणजे युक्रेनवरील दबाव वाढविण्याचा प्रकार असल्याची टीका युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केली.

याआधी अमेरिकी विश्‍लेषक व आत्ता युक्रेनने केलेल्या या आरोपांवर रशियाने प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याच हद्दीत व जिथे आवश्यक आहे, त्याच ठिकाणी ही तैनाती केल्याचे रशियाने फटकारले आहे. याआधीही रशियावर युक्रेनच्या सीमेजवळ मोठ्या संख्येने सैन्यतैनात केल्याचा आरोप झाला होता. गेल्या काही आठवड्यांपासून युक्रेन नाटोत सहभागी होण्याची तयारी करीत आहे. नाटोतील आपला प्रवेश कुणीही रोखू शकत नसल्याचे युक्रेनने म्हटले होते. अशा परिस्थितीत, रशियाने ही तैनाती करून युक्रेनसह नाटोलाही इशारा दिल्याचा दावा अमेरिकेतील विश्‍लेषक व माध्यमे करीत आहेत.

पण रशियाची सदर तैनाती अमेरिकेसाठी धोक्याची सूचना देणारी नसल्याचे अमेरिकेचे वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. ‘याआधीही रशियाने अशाप्रकारे सैन्यतैनाती केली होती. त्यामुळे या नव्या तैनातीचा अर्थ काय? याबाबत आम्हाला अजून काहीच ठाऊक नाही. त्यामुळे वेळेआधीच यावर बोलणे योग्य ठरणार नाही’, असे अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मिले म्हणाले.

leave a reply