चीनचा विरोध धुडकावून युरोपिय शिष्टमंडळ तैवान दौर्‍यावर दाखल

तैपई/ब्रुसेल्स/बीजिंग – चीनच्या धमक्यांची पर्वा न करता बुधवारी युरोपिय संसदेचे शिष्टमंडळ तैवान दौर्‍यावर दाखल झाले. संसदेतील १३ सदस्यांच्या समावेश असलेला हा दौरा युरोपच्या वतीने तैवानला दिलेली पहिली उच्चस्तरीय भेट ठरली आहे. या भेटीतून युरोपिय महासंघाने चीनला योग्य संदेश दिल्याचा दावा विश्‍लेषकांनी केला. चीनकडून या दौर्‍यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली असून तैवानच्या मुद्यावर जगाला चुकीचे संदेश देऊ नयेत, असा इशारा दिला आहे. दोन महिन्यांपूर्वीच युरोपिय संसदेने तैवानबरोबरील संबंध बळकट करण्याचा निर्णय घेतला होता.

चीनचा विरोध धुडकावून युरोपिय शिष्टमंडळ तैवान दौर्‍यावर दाखलफ्रान्सचे सदस्य राफेल ग्लुक्समान यांच्या नेतृत्त्वाखाली युरोपचे संसदीय शिष्टमंडळ बुधवारी तैवानमध्ये दाखल झाले. दाखल झाल्यावर त्यांनी सुरुवातीला तैवानचे पंतप्रधान सु त्सेंग-चँग व त्यानंतर गुरुवारी तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांची भेट घेतली. ‘आम्ही अत्यंत साधा व स्पष्ट संदेश देण्यासाठी इथे दाखल झालो आहोत. तैवान एकटा नाही, युरोप तुमच्याबरोबर उभा आहे’, या शब्दात ग्लुक्समान यांनी दौर्‍याचा उद्देश स्पष्ट केला. आजची भेट हे पहिले महत्त्वाचे पाऊल असून उच्चस्तरिय भेटीगाठी व बैठका पार पडतील, अशी ग्वाही युरोपिय शिष्टमंडळाने दिली.

‘तैवान व युरोपिय महासंघ सर्व क्षेत्रांमध्ये भागीदारी मजबूत करण्यावर भर देतील, अशी आशा आहे. अपप्रचाराविरोधात युरोपबरोबर लोकशाहीवादी आघाडी स्थापन करण्यास आम्ही उत्सुक आहोत’, अशी प्रतिक्रिया तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी यावेळी दिली. चीनचा विरोध धुडकावून युरोपिय शिष्टमंडळ तैवान दौर्‍यावर दाखलयुरोपिय संसदेच्या शिष्टमंडळाने तैवानची अधिकृत भेट घेणे हा चीनच्या सत्ताधारी राजवटीसाठी मोठा धक्का ठरतो.

युरोपिय संसदेच्या शिष्टमंडळाने दिलेल्या भेटीचा चीनने तीव्र शब्दात निषेध केला आहे. युरोपिय महासंघाने आपल्या चुका सुधाराव्यात व तैवानच्या मुद्यावर चुकीचे संदेश देऊ नयेत, अशा शब्दात चीनच्या परराष्ट्र प्रवक्त्यांनी बजावले. चीनने यापूर्वीही युरोपला ‘वन चायना प्रिन्सिपल’ची आठवण करून देत तैवानच्या बाबतीत इशारे दिले होते. मात्र गेल्या वर्षभरात युरोपिय देश चीनच्या अशा दडपणांकडे दुर्लक्ष करून स्वतंत्र निर्णय घेत असल्याचे समोर येत आहे. तैवानच्या मुद्यावरील महासंघाचे धोरणही अशाच निर्णयाचा भाग दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी युरोपचा दौरा केला होता. या दौर्‍यात युरोपमधील अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांनी तैवानच्या मंत्र्यांबरोबर चर्चा केल्याचे समोर आले होते. या भेटीआधी, महासंघाचा सदस्य देश असणार्‍या लिथुआनियाने तैवानबरोबरील संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेण्याची घोषणा केली होती.

leave a reply