नवी दिल्ली – गेल्या महिन्यात श्रीनगर आणि संयुक्त अरब अमिरातच्या शारजादरम्यान विमान सेवेला सुरूवात झाली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी अचानक पाकिस्तानाने या विमानसेवेसाठी आपले हवाई क्षेत्र वापरण्यास मनाई केली. भारताने यानंतर पाकिस्तानकडे राजनैतिक पातळीवर हा मुद्दा उपस्थित केला असल्याचे वृत्त आहे. तसेच पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र या हवाईसेवेसाठी बंद केले असले, तरी भारत या मार्गावर विमानसेवेची संख्या आणखी वाढविण्यावर विचार करीत असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचवेळी पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा विचारही केला जात असल्याची बातमी आहे.
२३ ऑक्टोबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जम्मू-काश्मीर दौर्यात श्रीनगर-शारजा या आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा शुभारंभ झाला होता. याच्या आठवडाभराआधी युएईच्या दुबई प्रशासनाबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी भारताने करार केला होता. या करारानंतर ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनमधील (ओआयसी) प्रमुख देश काश्मीर मुद्यावर भारताच्या बाजूने उभे राहत असल्याची चर्चा पाकिस्तानात सुरू झाली होती. पाकिस्तान युएईला विरोध करू शकणार नाही आणि तसे केल्यास पाकिस्तानला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे पाकिस्तानचे विश्लेषक सांगत होते. त्यामध्ये श्रीनगर-शारजा विमानसेवा सुरू झाल्यावर पाकिस्तानमधील ही अस्वस्थता अधिकच वाढली. श्रीनगर-शारजा विमानसेवेसाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र वापरण्यास परवानगी कशी काय दिली? काश्मीर मुद्दा सोडून दिला का? असे प्रश्न पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारला विचारले जात होते. पाकिस्तानी माध्यमांमध्ये यावर जोरदार चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांचे सरकार प्रचंड दडपणाखाली आले व त्यानंतर या विमानसेवेसाठी आपली हद्द वापरु न देण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला.
मंगळवारी अचानक गो एअरच्या या विमानसेवेला परवानगी नाकारल्यामुळे या विमानाला मोठा वळसा घालून गुजरात व तेथून ओमानमार्गे प्रवास करावा लागला. त्यामुळे श्रीनगर ते शारजापर्यंतचे अंतर आणखी एका तासाने वाढले. पाकिस्तानने हवाई सेवेसाठी मार्ग का नाकारला याचे कारण दिलेले नाही. मात्र पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र या सेवेसाठी बंद केले तर ही सेवा व्यवहार्य उरणार नाही. त्यामुळे ही सेवा भारताला बंद करावी लागेल, असे पाकिस्तानच्या काही विश्लेषकांना वाटत आहे. याचीही चर्चा पाकिस्तानी माध्यमातून सुरू होती.
मात्र असे असले तरी भारत ही सेवा आणखी विस्तारण्याचा विचार करीत आहे. सध्या या मार्गावर आठवड्याला चारच दिवस विमान फेर्या होत आहेत. मात्र आता दरदिवशी श्रीनगर-शारजा विमानसेवा सुरू करण्यावर चर्चा सुरू आहे. याशिवाय जशास तसे प्रत्युत्तर म्हणून भारत लाहोरमधून सिंगापूरला जाणार्या विमानसेवेसाठी आपला हवाई मार्ग बंद करू शकतो. तसे झाल्यास लाहोरहून सिंगापूरला जाण्यासाठी पाकिस्तानला फार मोठा वळसा घालावा लागेल. लाहोरवरून कराची तेथून कोलंबो आणि येथून सिंगापूर असा असा प्रवास पाकिस्तानच्या विमानसेवेला करावा लागेल. दरम्यान, श्रीनगर-शारजा विमानसेवेला आपले हवाई क्षेत्र नाकारणार्या पाकिस्तानकडे भारताने राजनैतिक स्तरावर हा मुद्दा उपस्थित केला आहे. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील सामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करावा, असे भारताने म्हटल्याचे सरकारी अधिकारी सूत्रांनी सांगितले.