अथेन्स/अंकारा – तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी निर्वासितांच्या मुद्यावरून दिलेल्या धमकीनंतर ग्रीसच्या संरक्षणदलांना ‘हाय अलर्ट’वर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तुर्कीने आपल्या सीमा निर्वासितांसाठी खुल्या केल्या तर ग्रीसला जबरदस्त त्रास सहन करावा लागेल, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी धमकावले होते. यावेळी ग्रीस व अमेरिकेमधील सहकार्यावर नाराजी व्यक्त करताना अमेरिकेने चुकीचा पर्याय निवडला आहे, असा टोलाही तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी लगावला होता.
गेल्या वर्षभरापासून ग्रीस व तुर्कीमधील तणाव सातत्याने चिघळताना दिसत आहे. निर्वासितांची घुसखोरी, सागरी क्षेत्रावरील मालकी हक्क व इंधनाचे साठे या मुद्यांवर तुर्कीने घेतलेली हटवादी भूमिका तणावाचे कारण ठरली आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तसेच आघाडीच्या नेत्यांसह तुर्कीतील माध्यमे ग्रीसला सातत्याने धमकावत आहेत. ग्रीसकडून अमेरिका व फ्रान्ससह इतर देशांबरोबरील वाढत्या सहकार्यामुळे तुर्की अधिक अस्वस्थ झाला असून धमक्यांची तीव्रताही वाढू लागली आहे.
तुर्कीच्या संरक्षणमंत्र्यांनी गेल्या महिन्यात ग्रीस व फ्रान्समधील सहकार्याच्या मुद्यावरून नाटो तसेच ग्रीसला बजावले होते. आता तुर्की राष्ट्राध्यक्षांनी निर्वासितांवरील कारवाईचा आधार घेत ग्रीसला धमकावले आहे. ‘तुर्कीने निर्वासितांसाठी सीमा पूर्णपणे खुल्या केल्या तर ग्रीसला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. तुर्कीत सध्या ५० लाख निर्वासित आहेत, याची जाणीव ठेवा. ग्रीसचे नेतृत्त्व या मुद्यावर कृतघ्न भूमिका घेत आहे’, अशी धमकी एर्दोगन यांनी दिली.
यावेळी त्यांनी ग्रीस व अमेरिकेमधील संरक्षण सहकार्याच्या मुद्यावरही नाराजी व्यक्त केली. अमेरिकेने या क्षेत्रात चुकीचा शेजारी निवडला असून संपूर्ण ग्रीस आता अमेरिकेचा तळ बनला आहे, असा टोला एर्दोगन यांनी लगावला. निर्वासित तसेच अमेरिकेबरोबरील सहकार्याच्या मुद्यावरून एर्दोगन यांनी केलेली वक्तव्ये ग्रीसने गांभीर्याने घेतली आहेत. त्यांच्या वक्तव्यानंतर ग्रीसच्या संरक्षणदलांनी तातडीची बैठक घेत सर्व दलांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले. तुर्कीबरोबरील सीमाभागात कोणतीही अनपेक्षित घटना घडल्यास त्याची ताबडतोब माहिती देण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी जमीन तसेच सागरी क्षेत्रातील टेहळणी अधिक वाढविण्याचेही आदेश देण्यात आल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले.
गेल्या वर्षी इंधनाच्या साठ्यांवरून निर्माण झालेल्या तणावादरम्यान तुर्कीने आपल्या युद्धनौका ग्रीसच्या हद्दीनजिक तैनात केल्या होत्या. त्यानंतर ग्रीसनेही आपल्या संरक्षणसज्जतेकडे अधिक लक्ष पुरविले असून अमेरिका, फ्रान्स, इस्रायल यासारख्या देशांबरोबर महत्त्वाचे करारही केले आहेत.