निर्वासितांच्या घुसखोरीसाठी पोलंडच्या सुरक्षादलांवर बेलारुसच्या लष्कराचा लेझर आणि अश्रुधुराचा मारा

अश्रुधुराचावॉर्सा/मिन्स्क – सीमेवर असलेल्या हजारो निर्वासितांना पोलंडमध्ये घुसविण्यासाठी बेलारुसच्या लष्कराने आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. बेलारुस लष्कराकडून सीमेवर असलेले कुंपण तोडण्यात आले असून निर्वासितांना अश्रुधुराची नळकांडी पुरविण्यात आल्याचे समोर आले. रात्रीच्या वेळेस बेलारुसच्या लष्कराने पोलंडच्या जवानांवर ‘स्ट्रोब लाईट्स’ तसेच लेझर्सचा वापर करून त्यांच्या मोहिमेत अडथळे आणल्याचेही उघड झाले. बेलारुसच्या लष्कराच्या या कारवायांमुळे या भागात संघर्षाची ठिणगी उडू शकते, असा इशारा विश्‍लेषक व अधिकार्‍यांकडून देण्यात आला आहे.

पोलंडच्या ‘बॉर्डर फोर्स’कडून बेलारुसच्या वाढत्या कारवायांची माहिती देण्यात आली. ‘शुक्रवारी रात्रीपासून पोलंडमधील झेरेम्का सीमेनजिक बेलारुसच्या लष्कराकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. बेलारुसच्या जवानांनी या भागात उभारलेले तारांचे कुंपण तोडले व त्यातून निर्वासितांना घुसविण्याचा प्रयत्न केला. पोलंडच्या पथकाने प्रत्युत्तर देऊ नये म्हणून बेलारूसच्या लष्कराने लेझर बीम्स व स्ट्रोब लाईट्सचा वापर केला. निर्वासितांना अश्रुधुराची नळकांडीही पुरविण्यात आली होती. निर्वासितांनी पोलंडच्या सुरक्षादलांविरोधात त्याचा वापर केला’, असे पोलंडकडून सांगण्यात आले.

अश्रुधुराचापोलंडच्या सीमेवर होणार्‍या या कारवाया बेलारुसचे हुकुमशहा अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या आदेशांवरून सुरू असल्याचे सांगण्यात येते. पोलंडच्या पंतप्रधानांनी सीमेवर निर्माण झालेल्या संकटामागे लुकाशेन्को यांच्याबरोबरच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा हात असल्याचा उघड आरोप केला. पुतिन हे पोलंडच्या सीमेवरील तणावामागचे खरे सूत्रधार असल्याचा ठपका पोलंडचे पंतप्रधान मॅटेस्झ मोराविकी यांनी ठेवला आहे. मात्र पुतिन यांनी हे आरोप फेटाळले असून, बेलारुस-पोलंड सीमेवरील घटनांशी रशियाचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

पोलंड व बेलारुसच्या सीमेवर सुरू असलेल्या घटनांमधून संघर्षाची ठिणगी उडू शकते, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे. पोलंड तसेच लिथुआनियातील विश्‍लेषकांनी बेलारुसकडून घुसविण्यात येणारे निर्वासित व इतर कारवाया म्हणजे ‘हायब्रिड वॉरफेअर’ अर्थात अश्रुधुराचाप्रगत युद्धतंत्राचा भाग असल्याचे बजावले आहे. बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष निर्वासितांचा वापर शस्त्रासारखा करीत असल्याचा दावाही करण्यात येतो. यामागे गेल्या वर्षभरातील घटनाक्रम कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते.

गेल्या वर्षी बेलारुसमध्ये सर्वेसर्वा राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्याविरोधात आंदोलन सुरू झाले होते. या आंदोलनाला अमेरिकेसह युरोपिय महासंघाने समर्थन दिले आहे. लुकाशेन्को यांना विरोध करणार्‍या नेत्यांना काही युरोपिय देशांनी आश्रयही दिला असून बेलारुसवर दडपण टाकण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. युरोपिय महासंघाकडून लुकाशेन्को व निकटवर्तियांच्या मालमत्ता तसेच संपत्ती गोठविण्यात आली आहे. त्याचवेळी बेलारुसला देण्यात येणारे अब्जावधी युरोचे अर्थसहाय्यही रोखण्यात आले. त्यामुळे भडकलेल्या लुकाशेन्को यांनी रशियाच्या सहाय्याने निर्वासितांना युरोपात घुसविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

leave a reply