बीजिंग/वॉशिंग्टन – येत्या मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात व्हर्च्युअल बैठक होणार आहे. त्याआधी चीनच्या ईस्टर्न थिएटर कमांडने तैवानजवळ युद्धसराव केला. आपल्या सार्वभौमत्चाच्या सुरक्षेसाठी हा सराव असल्याचे चीनने जाहीर केले. त्याचबरोबर तैवानच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिकेने पाठिंबा देणे थांबवावे, अशी धमकी चीनने दिली आहे. त्यामुळे तैवानबाबत बायडेन प्रशासनाशी तडजोड करणार नसल्याचा संदेश चीनने दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना हुवेई, व्यापारयुद्ध, हॉंगकॉंग, तैवान या प्रकरणांमुळे अमेरिका आणि चीनमधील तणावपूर्ण बनले होते. हे संबंध सुरळीत करण्यासाठी अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या हालचाली सुरू आहेत. यासाठी गेल्या दोन महिन्यांमध्ये अमेरिका व चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये विशेष बैठक पार पडली होती. तर अमेरिकेच्या परराष्ट्र उपमंत्री वेंडी शर्मन यांनी चीनचा दौरा करुन सहकार्य सुरळीत करण्याबाबत चर्चा केली होती. मंगळवारी बायडेन आणि जिनपिंग यांच्यात होणार्या व्हर्च्युअल बैठकीतही यासाठी प्रयत्न होतील. मात्र या बैठकीच्याआधी चीनने अमेरिकेला इशारा दिला आहे.
चीनच्या ईस्टर्न थिएटर कमांडने तैवानजवळ सराव सुरू केला असून यामध्ये चीनच्या लष्कर, नौदल तसेच हवाईदलाचाही समावेश आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकन कॉंग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने तैवानचा दौरा केला होता. तैवान हा आपलाच भूभाग असून अमेरिकी सिनेटर्सच्या या दौर्याचा निषेध करण्यासाठी तैवानजवळ सराव करण्याचे चीनने जाहीर केले होते. पण बायडेन यांच्याबरोबरच्या बैठकीआधी हा सराव करुन चीनने अमेरिकेला आपण तैवानबाबत तडजोड करणार नसल्याचे दाखवून दिले आहे.
या सरावाबरोबर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बायडेन प्रशासनाला इशाराही दिला. ‘तैवान हा चीनचा सार्वभौम भूभाग असून तैवानच्या स्वातंत्र्यासाठीचे प्रयत्न या क्षेत्रातील शांती आणि स्थैर्यासाठी धोकादायक ठरतील. त्यामुळे बायडेन प्रशासनाने तैवानच्या स्वातंत्र्याला आपला विरोध जाहीर करावा आणि वन-चायना भूमिकेशी एकनिष्ठ रहावे’, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी बजावले. चीनच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून तैवानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिला तर त्याचे परिणाम बुमरँगप्रमाणे अमेरिकेवर उटलतील, अशी धमकी परराष्ट्रमंत्री वँग यांनी दिली.
बायडेन प्रशासन चीनबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी धडपडत असताना, अमेरिकेची इंडो-पॅसिफिक कमांड या क्षेत्रातील इतर देशांबरोबर सहकार्य सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडच्या वरिष्ठ अधिकार्यांनी गेल्या महिन्याभरात जपान आणि भारताचा दौरा केला. त्याचबरोबर तैवानचे आखात, साऊथ चायना सी या क्षेत्रात गस्त आणि सरावाचे आयोजन केले होते. बायडेन प्रशासनाचे चीनविषयक धोरण अमेरिकन संरक्षण व्यवस्था यांच्यातील विसंवाद यामुळे पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.