गडचिरोलीतील कारवाईमुळे माओवाद्यांना मोठा धक्का; महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील माओवाद्यांच्या कारवायांना लगाम लागेल

- गडचिरोलीच्या पोलीस अधिक्षकांचा दावा

नागपूर – शनिवारी सी-६० कमांडो पथकाने गडचिरोलीतील कोरचीमधील जंगलात केलेल्या कारवाईत २६ माओवादी ठार झाले होते. अजूनही या जंगलात व्यापक शोधमोहिम सुरू आहे. या कारवाईने माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमधील माओवादी कारवायांना यामुळे लागम लागणार आहे, असे गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक अंकीत गोयल यांनी म्हटले आहे. तसेच या ठिकाणी १०० माओवादी होते, अशी माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० कमांडो पथकाच्या जवानांनी गडचिरोलीत गेल्या तीन वर्षातील माओवाद्यांविरोधातील सर्वात मोठे ऑपरेशन शनिवारी केले. यामध्ये २६ माओवादी ठार झाले. यामध्ये सहा महिला माओवाद्यांचा समावेश आहे. ठार झालेल्या माओवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अद्याप दहा माओवाद्यांची ओळख पटलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईत माओवाद्यांचे दोन कमांडर ठार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये मिलिंद तेलतुंबडे या मोस्ट वॉंटेड माओवाद्याचाही समावेश आहे.

मिलिंद तेलतुंबडेवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. दहशतवादी प्रकरणाचा तपास करणारी राष्ट्रीय तपास संस्थाही (एनआयए) तेलतुंबडेचा शोध घेत होती. तेलतुंबडे हा शहरी माओवादी (अर्बन नक्षल) आणि जंगलात कारवाया करणार्‍या माओवाद्यांमधील मोठा दूवा होता. तसेच माओवादी संघटनेत तरुणांची भरती करून घेण्याचे कामही त्याच्याकडे होते. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात उसळलेल्या दंगली आणि एक मे २०१९ रोजी सी-६० कमांडोंना घेऊन जाणार्‍या बसवर झालेल्या हल्ल्यामागेही तेलतुंबडेचा हात होता. या हल्ल्यात १६ जवान शहीद झाले होते. एनआयएच्या माहितीनुसारकॉम्रेड एम. दीपक, सह्याद्री अशा वेगवेगळ्या नावांनी नक्षलवाद्यांमध्ये त्याची ओळख होती.

मिलिंद तेलतुंबडे हा माओवाद्यांचा महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड (एमएमसी) विभागाचा प्रमुख होता. ५० लाखांचा इनामी माओवादी कमांडर असलेला मिलिंद तेलतुंबडे सध्या महाराष्ट्रातील माओवादी संघटनेचा एकमेव नेता उरला होता. त्यामुळे तो मारला जाणे महाराष्ट्रातील माओवाद्यांसाठी मोठा धक्का आहे. मात्र त्याचबरोबर मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील माओवाद्यांच्या कारवायांनाही यामुळे लगाम लागणार असल्याचा दावा यामुळेच करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी एका माओवाद्याला अटक केली होती. त्याच्या चौकशीत सुमारे ३०० माओवाद्यांना एमएमसी झोनमध्ये आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याच्याकडून मिळालेल्या इतर माहितीच्या आधारावर शनिवारचे ऑपरेशन आखण्यात आले, अशी माहिती पोलीस अधिक्षक अंकीत गोयल यांनी दिली आहे.

या ऑपरेशनमध्ये सी-६० कमांडोंंची पाच पथके म्हणजे ३०० जवान सहभागी झाले होते. तसेच चकमक मार्दीनटोला जंगलातील ज्या भागात उडाली, तेथे किमान १०० माओवादी उपस्थित होते, असेही गोयल यांनी सांगितले. येथे विखुरलेले सामान, सापडलेली शस्त्रे यावरून हा अंदाज बांधण्यात आला आहे. इतर माओवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. सुमारे दहा तास चकमक सुरू होती. दोन्ही बाजूने बराच गोळीबार झाला. चकमकीच्या ठिकाणाहून २९ शस्त्र जप्त करण्यात आली आहे. यामध्ये एके-४७ रायफल, एसएलआर रायफल, अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चर (युबीजीएल) यासारख्या शस्त्रांचा समावेश आहे.

दरम्यान, गडचिरोलीत माओवादी कारवायांसाठी इतर राज्यातून माओवाद्यांना आणले जात आहे. कारण आता स्थानिक तरुण माओवादी संघटनेमध्ये भरती होण्यास तयार नाहीत. त्यामुळे इतर राज्यातून भरती करून येथे माओवाद्यांना आणले जात होते. शनिवारी ठार झालेले बहुतांश माओवादी हे छत्तीसगडमधील आहेत. तरीसुद्धा ते महाराष्ट्रात कार्यरत होते, याकडे पोलीस अधिक्षक गोयल यांनी लक्ष वेधले.

leave a reply