मॉस्को – बंदिस्त राजवट अथवा व्यवस्थेत अराजकतेची वाढ होत राहते, असा दावा करून पुढील काळात रशियातही अराजकता व अस्थैर्य माजू शकते, असा इशारा राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे माजी सल्लागार व्लादिस्लाव सुर्कोव्ह यांनी दिला. रशियात तयार होणार्या अस्थैर्याचा धोका वाढत असून तो रोखता येणार नाही, मात्र देशाने उदारमतवादी प्रयोगांच्या दिशेने जाऊ नये. अशातून अपयशच मिळू शकते, असेही सुर्कोव्ह यांनी बजावले. सुर्कोव्ह यांनी १९९९ ते २०२० अशी दोन दशके व्लादिमिर पुतिन यांचे निकटवर्तिय तसेच सल्लागार म्हणून काम केले होते. त्यामुळे त्यांचे वक्तव्य लक्षवेधी ठरते.
‘ऍक्च्युअल कॉमेंट’ नावाच्या रशियन वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात सुर्कोव्ह यांनी रशियातील परिस्थितीवर भाष्य केले आहे. यात त्यांनी ‘सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स’चा हवाला देऊन, अव्यवस्था (डिसऑर्डर) ही नेहमीच वाढत राहते असा जगाचा नियम आहे, याकडे लक्ष वेधले आहे. याची तुलना सामाजिक असंतोषाशी करून या असंतोषावर नियंत्रण राखण्यासाठी देशात मजबूत राजवट असणे आवश्यक असते, असे सुर्कोव्ह यांनी म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी गेल्या शतकातील अखेरचे दशक व नव्या शतकातील पहिल्या दोन दशकांमधील रशियाची तुलना केली आहे.
‘१९९० व त्यानंतरच्या काळात रशियामधील सामाजिक अराजकता माजली होती. पण सतत आघात सहन करणार्या देशाला पुनर्रचनेच्या ढिगार्याखालून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर २१ व्या शतकातील पहिल्या दोन दशकांमध्ये रशियाने स्थैर्य टिकविण्यात यश मिळविले आहे. पुढील काळात ही दोन दशके म्हणजे रशियासाठी सुवर्णकाळ म्हणून ओळखला जाईल’, असे पुतिन यांचे माजी सल्लागार व्लादिस्लाव सुर्कोव्ह म्हणाले. मात्र पुढील काळात, कदाचित लवकरच, रशियाला अराजकतेला तोंड द्यावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने रशियात हे अराजक निर्माण होईल, असे सुर्कोव्ह यांनी बजावले. ‘मात्र जनतेतील वाढत्या असंतोषावर तोडगा काढण्यासाठी रशियाने आपली राजकीय व्यवस्था अधिक खुली करण्याचा प्रयत्न करु नये. त्यातून नागरिकांमधील चीड व संताप अनियंत्रित पद्धतीने बाहेर पडण्याची भीती असून त्यातून निर्माण झालेल्या अस्थैर्यावर उपाययोजनाही करता येणार नाही’, असेही व्लादिस्लाव सुर्कोव्ह यांनी बजावले.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन १९९९ सालापासून देशाचे नेतृत्त्व करीत आहेत. सुरुवातीच्या काळात रशियन अर्थव्यवस्था सावरून स्थैर्य देणारे मजबूत नेतृत्त्व म्हणून पुतिन ओळखण्यात येत होते. मात्र गेल्या काही वर्षात त्यांची लोकप्रियता कमी होत असून ते सत्तेवरील आपली पकड दीर्घकाळ टिकविण्यासाठी विरोध चिरडत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला ऍलेक्सी नॅव्हॅल्नी यांच्यावरील कारवाईच्या प्रकरणावरून रशियात पुतिन यांच्याविरोधात तीव्र निदर्शनेही झाली होती.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत पुतिन यांच्या पक्षाने बहुमत कायम राखले असले तरी त्यांच्या मतांची टक्केवारी घटली आहे. रशियाच्या तरुणाईत पुतिन यांची लोकप्रियता घटल्याचा दावाही एका सर्वेक्षणात करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पुतिन यांच्याबरोबर दोन दशके काम करणार्या सल्लागारांनी दिलेला इशारा महत्त्वाचा ठरतो.