वॉशिंग्टन/टोकिओ – इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी अमेरिका व जपानमध्ये ‘टू प्लस टू` चर्चा पार पडली. या चर्चेत अमेरिकेची जपानमधील लष्करी तैनाती व हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या धोक्याला प्रत्युत्तर देणाऱ्या यंत्रणेसंदर्भात करार करण्यावर एकमत झाल्याची माहिती दोन्ही बाजूंकडून देण्यात आली. जपान व ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या संरक्षण सहकार्य करारानंतर अवघ्या 24 तासांच्या अवधीत झालेली ही चर्चा लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. चर्चेनंतर अमेरिका व जपानने प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनावर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
गेल्या शतकात झालेल्या दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने जपानबरोबर व्यापक संरक्षण सहकार्य करार केला होता. त्यानुसार अमेरिकेने जपानच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आहे. असे असले तरी चीनच्या विस्तारवादी कारवाया व वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जपानने आपले धोरण अधिक आक्रमक केले आहे. चीनविरोधात कोणताही धोका पत्करण्याची जपानच्या नेतृत्त्वाची तयारी नसून मित्रदेश अमेरिकेसह इतर देशांबरोबरील सहकार्यही वाढविण्यात येत आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत अमेरिका व जपानमध्ये काही प्रमाणात मतभेद निर्माण झाले होते. हे मतभेद मिटविण्यासाठी दोन्ही देशांनी पावले उचलली असून चीनविरोधी आघाडी अधिक भक्कम करण्याचे संकेत दिले आहेत. गुरुवारी व शुक्रवारी दोन्ही देशांच्या परराष्ट्र तसेच संरक्षणमंत्र्यांमध्ये पार पडलेल्या चर्चेतून ही बाब अधोरेखित करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअली पार पडलेल्या ‘टू प्लस टू` बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले.
या निवेदनात मुक्त व खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्राचा उल्लेख करून चीनकडून ‘ईस्ट चायना सी` तसेच ‘साऊथ चायना सी`मध्ये सुरू असलेल्या लष्करी कारवायांवर टीकास्त्र सोडण्यात आले. चीनच्या या कारवायांना रोखण्यासाठी संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्याची ग्वाही दोन्ही देशांनी दिली. अमेरिकेच्या जपानमधील लष्करी तैनातीबाबत असलेल्या अडचणी दूर झाल्या असून लवकरच यासंदर्भातील करार पार पडेल, अशी माहिती निवेदनात देण्यात आली.
त्याचवेळी हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या धोक्याचा उल्लेख करून हा धोका रोखणाऱ्या यंत्रणा संयुक्तरित्या विकसित करण्यात येतील व त्यासाठी करार करण्याचे संकेत अमेरिका व जपानने दिले आहेत. हायपरसोनिक क्षेपणास्त्रांबरोबरच अंतराळक्षेत्रातील क्षमता तसेच आर्टिफिशल इंटेलिजन्ससारख्या प्रगत तंत्रज्ञानासंदर्भात सहकार्य वाढविण्यासाठी पावले उचलण्याबाबतही चर्चा झाल्याचे निवेदनात सांगण्यात आले. ‘क्वाड` गटातील सहकार्य वाढविणे तसेच तैवान मुद्यावर अधिक सक्रिय भूमिका घेण्याबाबत दोन्ही देशांमध्ये बोलणी झाल्याची माहितीही देण्यात आली आहे.