हिजबुल्लाहपासून अरब देशांच्या सुरक्षेला धोका

- लेबेनॉनमधील सौदी अरेबियाचे राजदूत

सौदी अरेबियाचे राजदूतरियाध/बैरूत – ‘हिजबुल्लाहच्या दहशतवादी कारवाया आणि लष्करी हस्तक्षेप या क्षेत्रातील अरब देशांच्या सुरक्षेसाठी धोका ठरत आहेत. हे लक्षात घेऊन लेबेनॉनमधील इतर राजकीय पक्ष आपल्या देशाच्या हितसंबंधांना प्राधान्य देतील व हिजबुल्लाहचे दहशतवादी वर्चस्व संपुष्टात आणतील, अशी अपेक्षा आहे`, असा संदेश लेबेनॉनमधील सौदी अरेबियाचे राजदूत वालिद बुखारी यांनी दिला आहे. हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला याने दोन दिवसांपूर्वी सौदीचे राजे सलमान यांच्यावर केलेल्या दहशतवादाच्या आरोपानंतर सौदीकडून ही प्रतिक्रिया आली आहे.

सौदी अरेबियाचे राजदूतलेबेनॉनमधील सौदीचे राजदूत वालिद बुखारी यांनी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना हिजबुल्लाहच्या प्रमुखाने केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. ‘सौदी अरेबिया आणि लेबेनॉनमधील सहकार्य अतिशय जूने असून काही मुर्खांनी केलेल्या बेजबाबदार विधानांचा यावर परिणाम होणार नाही`, अशी जळजळीत टीका राजदूत बुखारी यांनी केली. ‘मात्र लेबेनॉनमधील सत्ताधारी तसेच विरोधीपक्षाने एकत्र येऊन सौदी व शेजारी अरब मित्रदेशांच्या सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या हिजबुल्लाहचे दहशतवादी वर्चस्व नष्ट करण्याला प्राधान्य द्यावे`, असा संदेश बुखारी यांनी दिला.

हिजबुल्लाहच्या दहशतवादी कारवाया लेबेनॉनमधील शांतीवरही परिणाम करीत असल्याचे राजदूत बुखारी यांनी लक्षात आणून दिले. लेबेनॉनचे स्थैर्य आणि सार्वभौमत्वाला सौदीचे कायम समर्थन असेल, असे बुखारी पुढे म्हणाले. या आठवड्याच्या सुरुवातीला सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी इराण तसेच इराणचे समर्थन असलेल्या आखातातील दहशतवादी संघटनांवर टीका केली होती.

सौदी अरेबियाचे राजदूतलेबेनॉनमधील हिजबुल्लाह तर येमेनमधील हौथी बंडखोर यांच्यापासून या क्षेत्रातील स्थैर्य व सुरक्षा धोक्यात असल्याचा इशारा राजे सलमान यांनी दिला होता. त्याचबरोबर लेबेनीज जनतेने हिजबुल्लाहची हुकूमशाही उधळून लावावी, असे आवाहन राजे सलमान यांनी केले होते. यानंतर हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाने सौदीचे राजे सलमान आणि सौदीवर दहशतवादाची गंभीर आरोप केले होते. इराक-सिरियातील दहशतवादासाठी सौदी जबाबदार असल्याचा ठपका नसरल्लाने ठेवला होता. हिजबुल्लाह प्रमुखाच्या या आरोपांवर प्रतिक्रिया येण्याच्या आधी लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांनी या आरोपांशी आपण सहमत नसल्याचे सांगून त्याला विरोध केला होता.

दरम्यान, लेबेनॉनच्या सरकारने वेगळी भूमिका घेतली असली तरी हिजबुल्लाहचे नेते सौदीवरील आरोपांवर ठाम आहेत. हिजबुल्लाहचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता शेख नईम कासेम याने देखील सौदीवर दहशतवादाचे आरोप केले. तसेच यापुढेही हिजबुल्लाहच्या कारवाया सुरूच राहतील, असे कासेम याने जाहीर केले. सौदीवर असे आरोप करून हिजबुल्लाह लेबेनॉनचे सध्याचे सरकार व सौदीमध्ये दुरावा निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

leave a reply