मॉस्को – कझाकस्तानचे सरकार उलथण्याचा आरोप ठेवून या देशाच्या दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख करीम मासिमोव्ह यांना अटक करण्यात आली. कझाकस्तानमधल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर झालेली ही पहिली मोठी अटक ठरते. दरम्यान, कझाकस्तानातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रशियाने आपले सैन्य पाठविले असून त्यावर अमेरिकेने जोरदार आक्षेप नोंदविला आहे.
गेल्या पाच दिवसांपासून कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात 26 निदर्शक तर 18 जणांचा बळी गेला. तर शेकडोजण जखमी झाल्याची माहिती कझाकस्तानच्या यंत्रणांनी दिली. याप्रकरणी 4,400 जणांना ताब्यात घेतले असून काही निदर्शकांकडून एके-47, एके-74, एकेएस-74यू या श्रेणीतील रायफल्सचा साठा तसेच 12जी शॉटगन्स, स्नायपर रायफली देखील जप्त करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी निदर्शकांनी इंधनविहिरींवर हल्ले चढविल्याचेही बोलले जाते. हिंसाचार बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याच्या बातम्या येत असून शनिवारी कझाकस्तानच्या सुरक्षादलांनी गेल्या पाच दिवसातील सर्वात मोठी कारवाई केली. दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख करीम मासिमोव्ह व त्यांच्यासह काही जणांना राष्ट्रदोहाच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे.
राष्ट्राध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांनी चार दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर मासिमोव्ह यांनी राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांच्याविरोधात सशस्त्र बंड पुकारण्याचा कट आखला होता, अशी माहिती सुरक्षा यंत्रणा देत आहेत. त्यासाठी मासिमोव्ह यांच्यावर ही कारवाई झाली आहे. यामुळे कझाकस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. कारण मासिमोव्ह हे माजी राष्ट्राध्यक्ष नूर सुल्तान यांचे विश्वसनीय मानले जातात.
दरम्यान, कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. आपण केलेल्या आवाहनानंतर शांतीसैनिक रवाना केले यासाठी राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांचे आभार व्यक्त केले. तसेच अजूनही देशातील काही भागात दहशतवादी दडल्याची चिंता कझाकस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त यावेळी केली.
माजी सोव्हिएत देशांच्या ‘कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रिटी ऑर्गनायझेशन-सीएसटीओ` अंतर्गत रशियाचे किमान 1,800 जवान कझाकस्तानात दाखल झाले असून काही पथक राजधानी नूर सुल्तान व अल्माटीमध्ये उतरल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. कझाकस्तानातील रशियन जवानांच्या या तैनातीवर अमेरिकेने आक्षेप नोंदविला.
कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी रशियन सैनिकांना आपल्या देशात आमंत्रित करून मोठी चूक केल्याची टीका अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी केली. ‘कझाकस्तानचे सरकार व यंत्रणांकडे निदर्शकांना हाताळण्याची क्षमता आहे. त्यामुळे यासाठी दुसऱ्या देशाकडून लष्करी सहाय्य घेण्याची आवश्यकता नाही, असे मला वाटते. रशियन्स एकदा तुमच्या घरात शिरले तर त्यांना बाहेर काढणे फारच अवघड बनते`, असा आरोप ब्लिंकन यांनी केला.
तर कझाकस्तानात भयंकर घडामोडी घडत असताना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री बालिश विधाने करीत आहेत, अशी टीका रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. कझाकस्तानच्या आवाहनानंतरच रशियाने आपले लष्कर रवाना केले, ही बाब रशियन परराष्ट्र मंत्रालय लक्षात आणून देत आहे.
कझाकस्तानासाठी सैन्य रवाना करणाऱ्या आर्मेनियाला धमक्या मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. कझाकस्तानातून सैन्य मागे घ्या, अन्यथा रशियातील दूतावासावर बॉम्बहल्ला चढविण्याची धमकी मॉस्कोतील आर्मेनियाचे दूतावासाला दिल्याच्या बातम्या येत आहेत.