जागतिक स्तरावरील सोन्याची मागणी चार हजार टनांवर

- वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचा अहवाल

सोन्याची मागणीलंडन – जागतिक स्तरावरील सोन्याच्या मागणीत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली असून गेल्या वर्षी सोन्याची मागणी चार हजार टनांवर जाऊन पोहोचल्याची माहिती ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने दिली आहे. ‘गोल्ड डिमांड ट्रेंड्स २०२१’ या अहवालानुसार, २०२० सालच्या तुलनेत २०२१ साली सोन्याची मागणी १० टक्क्यांहून अधिक वाढली आहे. कोरोनाच्या संकटातून जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी सुरू झालेले प्रयत्न हे यामागील एक प्रमुख कारण ठरल्याचे ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने म्हटले आहे.

२०२० साली कोरोनाच्या साथीमुळे जागतिक स्तरावर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. या निर्बंधांमुळे दैनंदिन व्यवहार थंडावले होते तसेच अर्थव्यवस्थेची गतीही मंदावली होती. त्याचा परिणाम सोन्याच्या मागणीवरही दिसून आला होता. २०२० साली सोन्याची मागणी ३,६५८ टनांपर्यंत घसरली होती. मात्र सोन्याची मागणी२०२१ साली त्यात हळुहळू वाढ होण्यास सुरुवात झाली व अखेरच्या तिमाहित ही मागणी तब्बल ५० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले, असे ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने आपल्या अहवालात म्हटले आहे.

सोन्याच्या वाढत्या मागणीत दागिने, नाणी, गोल्ड बार्स व तंत्रज्ञान क्षेत्रात नोंदविण्यात आलेली वाढ हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत. त्याचवेळी जगातील मध्यवर्ती बँकांनी केलेली खरेदीही लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. २०२१ साली मध्यवर्ती बँकांनी ४६३ टन सोने खरेदी केल्याची माहिती ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने दिली. जागतिक अर्थव्यवस्थेत डॉलरचे घटणारे मूल्य, वाढती महागाई व कोरोनाचे संकट या पार्श्‍वभूमीवर जगातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याच्या खरेदीकडे सोन्याची मागणीअसणारा कल पुन्हा वाढविल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. गेल्या दशकभरात जगातील विविध मध्यवर्ती बँकांनी सोन्याच्या राखीव साठ्यात तब्बल साडेचार हजार टनांची भर टाकली आहे.

२००८-०९ साली आलेल्या मंदीने सोन्याच्या साठ्यांमध्ये वाढ करण्याच्या प्रक्रियेला गती दिल्याचे उघड झाले आहे. गेल्या काही वर्षात अमेरिकी डॉलरबाबतची अनिश्‍चितता वाढू लागली असून चीन, रशिया तसेच युरोपिय देशांकडून त्याचा वापर घटू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर सोन्यावर असलेला विश्‍वास वाढत असून मध्यवर्ती बँकांची वाढती खरेदी तसेच वाढती मागणी त्याला दुजोरा देणारी ठरते. चीन व भारत या दोन देशांमध्ये सोन्याच्या मागणीत सर्वाधिक वाढ दिसून आल्याचेही ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने म्हटले आहे.

leave a reply