भारत व फिलिपाईन्समध्ये ब्रह्मोसचा करार संपन्न

नवी दिल्ली – भारत व रशियाची संयुक्त निर्मिती असलेली ब्रह्मोस क्षेपणास्त्रे फिलिपाईन्सला पुरविण्याचा करार भारताने केला आहे. सुमारे ३७ कोटी, ४० लाख डॉलर्सचा हा व्यवहार म्हणजे भारताच्या शस्त्रास्त्रांच्या निर्यातीमधील महत्त्वाचा टप्पा ठरतो. हे अतिप्रगत सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र कुठल्याही धोक्यापासून फिलिपाईन्सच्या सार्वभौमत्त्वाचे रक्षण करील, असा विश्‍वास फिलिपाईन्सच्या संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला आहे. साऊथ चायना सी क्षेत्रातील चीनच्या वर्चस्ववादी कारवायांपासून फिलिपाईन्सला धोका असल्याचे याआधी अनेकवार स्पष्ट झाले होते.

भारत व फिलिपाईन्समध्ये ब्रह्मोसचा करार संपन्नब्रह्मोस एरेस्पेस प्रायव्हेट लिमिटेडने फिलिपाईन्सशी हा करार केला. फिलिपाईन्सचे संरक्षणमंत्री डेल्फिन लॉरेझना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या करारासाठी उपस्थित होते. युद्धनौकाभेदी ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र खरेदी करून फिलिपाईन्सने आपली सुरक्षा सुनिश्‍चित केली, असा दावा संरक्षणमंत्री लॉरेझना यांनी केला. यामुळे फिलिपाईन्सच्या नौदलाला प्रतिहल्ला चढविण्याची क्षमता प्राप्त होईल, असे सांगून ही बाब फिलिपाईन्सच्या सार्वभौमत्त्वाचे रक्षण करणारी ठरेल असे लॉरेझना पुढे म्हणाले.

विशेषतः चीन आपला भाग म्हणून दावा करीत असलेल्या वेस्ट फिलिपाईन्स सीच्या क्षेत्राची सुरक्षा यामुळे भक्कम होणार असल्याचे सांगून संरक्षणमंत्री लॉरेझना यांनी याचे महत्त्व अधोरेखित केले. भारत व फिलिपाईन्समधील हा व्यवहार चीनला अस्वस्थ करणारा ठरतो. कारण काही महिन्यांपूर्वीच चीनने आपल्या नौदलाचा भाग असलेली शेकडो जहाजे फिलिपाईन्सच्या या सागरी क्षेत्रात रवाना केली होती. याद्वारे आपला या क्षेत्रावरील दावा भक्कम करण्याचा प्रयत्न चीनने करून पाहिला होता. त्यामुळे फिलिपाईन्सच्या नौदलाकडे प्रतिहल्ल्याची क्षमता येणे चीनला विचारात टाकणारी बाब ठरू शकते.

३७ कोटी, ४० लाख डॉलर्सचा भारत व फिलिपाईन्समधील हा करार संपन्न झाला असून यानुसार फिलिपाईन्सला किती ब्रह्मोस क्षेपणास्त्रे पुरविली जातील, याची माहिती उघड झालेली नाही. पण फिलिपाईन्सनंतर व्हिएतनाम देखील भारताकडून ब्रह्मोसची खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे चीनच्या चिंतेत अधिकच भर पडणार आहे.

leave a reply