वॉशिंग्टन – ‘अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट पाच राष्ट्राध्यक्षांनी केले नसेल, त्याहून अधिक नुकसान गेल्या १५ महिन्यांमध्ये ज्यो बायडेन यांनी करून दाखविले आहे’, असा घणाघात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. बायडेन यांच्या चुकीच्या धोरणांमुळे स्थलांतरितांची भलीमोठी लाट अमेरिकेवर धडकणार असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला. दरम्यान, अमेरिकेत नव्याने घेण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची लोकप्रियता घटली असून इंधन दरवाढीसाठी जनता बायडेन यांना जबाबदार धरत आहे.
२०२४ साली अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षीय पदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. दोन दिवसांपूर्वी नॉर्थ कॅरोलिनाच्या सेल्मा येथे पार पडलेल्या निवडणूक प्रचारात माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनाच्या गेल्या १५ महिन्यांच्या कारकिर्दीवर टीकास्त्र सोडले. बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर, राजकीय, धोरणात्मक, सामाजिक क्षेत्रात अमेरिकेचे नुकसानच केले, असा ठपका ट्रम्प यांनी ठेवला.
यासाठी अफगाणिस्तानातील बेजबाबदार सैन्यमाघार, इराणबरोबर अणुकरारावर सुरू असलेली चर्चा आणि सध्याच्या रशिया-युक्रेन युद्धाचा दाखला ट्रम्प यांनी दिला. बायडेन प्रशासन आंतरराष्ट्रीय स्तरावर एकामागोमाग एक अशी लांछनास्पद शरणांगती स्वीकारत असल्याची जळजळीत टीका ट्रम्प यांनी केली. बायडेन प्रशासनाचे पहिले १५ महिने अमेरिकेसाठी सर्वाधिक वाईट काळ असल्याचे ताशेरे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ओढले.
अमेरिकेच्या इतिहासातील पाच सर्वात वाईट राष्ट्राध्यक्षांची निवड केली आणि त्यांच्या कारकिर्दीत अमेरिकेला झाले नसेल, इतके नुकसान तरी बायडेन प्रशासनाच्या १५ महिन्यात झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. ‘टायटल ४२’ अर्थात सीमेवरील निर्वासितांची घुसखोरी रोखणारे कलम काढून टाकून बायडेन यांनी अमेरिकेवरील नव्या संकटाला आमंत्रण दिल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला.
टायटल ४२ काढल्यास निर्वासितांची मोठी लाट अमेरिकेच्या सीमेवर धडकेल व त्यांना आवरणे शक्य होणार नसल्याचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बजावले. गेल्या वर्षभरात या निर्वासितांच्या आडून बेकायदेशीर घुसखोरांनी अमेरिकेत प्रवेश मिळविला असून त्यांना ताबडतोब देशाबाहेर काढावे, अशी मागणी ट्रम्प यांनी केली. तसेच येत्या नोव्हेंबर महिन्यातील मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा विजय झाला तर अंतर्गत सुरक्षा प्रमुख अलेक्झांड्रो मायोर्कास यांची हकालपट्टी केली जाईल, असे ट्रम्प यांनी बजावले आहे. निर्वासितांच्या या घुसखोरीसाठी मायोर्कास जबाबदार ठरतात, असे सांगून ट्रम्प यांनी या कारवाईची घोषणा केली.
अमेरिकेची जनता राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या धोरणांवर असंतोष व्यक्त करीत आहे. इंधनाची दरवाढ व महागार्ईला बायडेन प्रशासनाने स्वीकारलेली चुकीची धोरणे जबाबदार असल्याचे अमेरिकी जनता सांगत आहे. यामुळे बायडेन यांची लोकप्रियता घसरणीला लागली असून राष्ट्राध्यक्ष बायडेन व त्यांचा डेमोक्रॅट पक्ष जनाधार गमावत असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.